अजिंक्य रहाणेची शानदार अर्धशतकी खेळी; मुंबईवर सहज मात

वर्ष बदलले, संघ बदलले, मैदान बदलले आणि निकालही बदलल्याची अनुभूती आयपीएलच्या नवव्या हंगामातील पहिल्या सामन्याने दिली. ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जला नमवून मुंबई इंडियन्सने गतवर्षी विजेतेपदावर नाव कोरले होते. परंतु यंदाच्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली अवतरणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स या नव्या संघाने आपल्या कारकीर्दीला प्रारंभ मुंबईसारख्या मातब्बर संघाला नऊ विकेट्स आणि ३२ चेंडू राखून नमवून केला. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर अजिंक्य रहाणेने साकारलेली नाबाद अर्धशतकी खेळी पुण्यासाठी महत्त्वाची ठरली.

मुंबईचे आव्हान पेलण्याच्या इष्रेने पुण्याने प्रारंभीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. रहाणेने ४२ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी उभारली. त्याने आधी फॅफ डू प्लेसिस (३४) सोबत ७८ धावांची दमदार सलामी दिली. मग केव्हिन पीटरसोबत (नाबाद २१) दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ४८ धावांची भागीदारी केली. रहाणेने हार्दिक पंडय़ाला षटकार खेचून

पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, हरभजन सिंगने ७ चौकार आणि एका षटकारासह ३० चेंडूंत साकारलेल्या नाबाद ४५ धावांच्या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सला निर्धारित षटकांत ८ बाद १२१ अशी धावसंख्या उभारता आली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या मुंबईला इशांत शर्माने दुसऱ्या आणि चौथ्या षटकात अनुक्रमे रोहित शर्मा आणि लेंडल सिमन्सला बाद करून सुरुंग लावला. मग पाचव्या षटकात मिचेल मार्शने हार्दिक पंडय़ा आणि जोस बटलर यांना बाद करून आणखी दोन धक्के दिले. त्यामुळे ४ बाद ३० अशा अवस्थेतल्या मुंबईतल्या संघाची मग ७ बाद ६८ अशी अवस्था झाली. अंबाती रायुडूने (२२) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उत्तरार्धात हरभजनने विनय कुमार (१२) सोबत आठव्या विकेटसाठी २८ धावांची आणि मिचेल मॅक्लॅघन (नाबाद २) यांच्यासह नवव्या विकेटसाठी नाबाद २५ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १२१ (हरभजन सिंग नाबाद ४५, अंबाती रायुडू २२; मिचेल मार्श २/२१, इशांत शर्मा २/३६) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स १४.४ षटकांत १ बाद १२६ (अजिंक्य रहाणे नाबाद ६६, फॅफ डू प्लेसिस ३४; हरभजन सिंग १/२४)

सामनावीर : अजिंक्य रहाणे.