डकवर्थ लुईस नियमानुसार हैदराबादवर विजय
सातत्याने पदरी पडणारे अपयश झटकून रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग स्पध्रेत मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला. विजयासाठी ११९ धावांचा पाठलाग करणाऱ्या पुण्याने ११ षटकांत ३ बाद ९४ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार पुण्याच्या अतिरिक्त ३४ धावा झाल्यामुळे त्यांना विजयी घोषित केले.
पावसाच्या व्यत्ययामुळे तासभर उशीरा सुरू झालेल्या लढतीत पुण्याने यजमान हैदराबादला निर्धारित २० षटकांत ८ बाद ११८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. पुण्याच्या अशोक दिंडाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याला मिचेल मार्शची उत्तम साथ लाभली. शिखर धवनची चिवट खेळी आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या झटपट २१ धावा वगळता इतर फलंदाजांनी निराश केले. धवनने ५३ चेंडूंत २ चौकार व एक षटकार लगावत नाबाद ५६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात पुण्याला पहिल्याच षटकात धक्का बसला. अजिंक्य रहाणेला भोपाळा फोडूही न देता भुवनेश्वर कुमारने माघारी धाडले. मात्र, स्टिव्हन स्मिथ आणि फॅफ डू प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भगीदारी करत पुण्याचा विजयाचा मार्ग सूकर केला. ११व्या षटकात पावसाने पुन्हा पुनरागमन केल्यामुळे सामना थांबविण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : ८ बाद ११८ (शिखर धवन नाबाद ५६; अशोक दिंडा ३-२३, मिचेल मार्श २-१४) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : ११ षटकांत ३ बाद ९४ (फॅफ डू प्लेसिस ३०, स्टिव्हन स्मिथ नाबाद ४६; भुवनेश्वर कुमार १-१७). (डकवर्थ लुईस नियमानुसार पुणे विजयी)