रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या दोन्ही संघांचे हे आयपीएलमधील पहिलेवहिले वर्ष. परंतु झोकात सलामी देत यशस्वी पदार्पण साजरे करणारे हे दोन संघ गुरुवारी एकमेकांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत.

दोन्ही संघांमध्ये बंदी घालण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील बहुतांशी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे एका संघातील ही दिग्गज मंडळी गुरुवारच्या लढतीत एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहेत. चेन्नई संघातील एके काळचे सहकारी आणि जिवलग मित्र सुरेश रैना हे उभय संघांचे नेतृत्व करीत रणनीती आखताना दिसतील. पिवळ्या जर्सीशिवाय खेळणे, हे भावनिकदृष्टय़ा आव्हानात्मक ठरते आहे, याची दोन्ही संघनायकांनी कबुली दिली आहे.

धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे सुपरजायंट्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध नऊ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. या संघात धोनीशिवाय स्टीव्हन स्मिथसारख्या खेळाडूचा समावेश आहे. गुजरातने मात्र सांघिक प्रयत्नांच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबला नामोहरम केले. पंजाबने फलंदाजी चांगली केली होती, परंतु गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्या पदरी पराभव पडला. आरोन फिन्चने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करीत गुजरातचा विजयाध्याय लिहिला. भारतीय युवा संघाचा कर्णधार इशन किशननेही आत्मविश्वासाने फलंदाजी केली.

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात ड्वेन ब्राव्होचा प्रभाव सुरूच आहे.  पंजाबचे चार बळी घेत आयपीएलमध्ये एक हजार धावा आणि शंभर बळी घेणारा तो एकमेव खेळाडू ठरला. गुजरातचा संघ सांघिकदृष्टय़ा मजबूत असला, तरी गाठ पुण्याशी आहे. आर. पी. सिंग व मिचेल मार्श या मध्यमगती गोलंदाजांसह आर. अश्विन आणि मुरुगन अश्विन यांच्यावर धोनीची मदार आहे. या लढतीत तरी धोनी अश्विनला गोलंदाजीची पूर्ण षटके देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

संघ

रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डू प्लेसिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, जस्करन सिंग, रवीचंद्रन अश्विन, अंकित शर्मा, अ‍ॅल्बी मॉर्केल, इरफान पठाण, इशांत शर्मा, इश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैन्स, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक दिंडा, दीपक चहर, स्कॉट बोलॅण्ड, पीटर हॅण्डसकॉम्ब, अ‍ॅडम झम्पा.

गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर, आरोन फिन्च, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे, इशन किशन, रवींद्र जडेजा, शदाब जकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, प्रदीप संगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, अ‍ॅण्ड्रय़ू टाय, सरबजित लड्डा, अक्षदीप नाथ, अमित मिश्रा, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी.

सामन्याची वेळ : रात्री ८ पासून