आयपीएलवरील संकटांची व्याप्ती कमी होण्याची कोणतीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणानंतर आता आयपीएलला आणखी एक जबर धक्का बसला आहे. पुणे वॉरियर्स संघाची मालकी असलेल्या सहारा समूहाने आयपीएलमधून माघारीचा निर्णय घेऊन सर्वानाच धक्का दिला. या मोसमाचे फ्रँचायझी शुल्क भरण्यात अपयशी ठरल्यानंतर सहारा समूहाची बँक हमी जप्त करण्याचे बीसीसीआयने ठरवल्यामुळे सहाराने तडकाफडकी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
‘‘बीसीसीआयची ही भूमिका योग्य नाही. बीसीसीआय संपूर्ण फ्रँचायझी शुल्क माफ करत नाही, तोपर्यंत आम्ही आयपीएलमध्ये परतणार नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि आयपीएलमधून माघार घेण्याचा आमचा निर्णय अंतिम आहे,’’ असे सहारा समूहाने पत्रकाद्वारे कळवले आहे.
‘‘९४ सामन्यांचा महसूल लक्षात घेता, सहाराने २०१०मध्ये १७०० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून फ्रँचायझी हक्क विकत घेतले होते. पण आम्हाला प्रत्येक मोसमादरम्यान फक्त ६४ सामनेच मिळत होते. त्यावेळी सहारा आणि कोची टस्कर्स केरळने याविरोधात बीसीसीआयकडे दाद मागून फ्रँचायझी बोलीची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. पण बीसीसीआयने आमचे म्हणणे मान्य केले नाही. बीसीसीआय खिलाडीवृत्तीनुसार आमच्या मागण्या मान्य करेल, या विश्वासाने आम्ही वाट पाहिली होती. पण बीसीसीआयला फक्त पैशांची चिंता असून फ्रँचायझीबाबत कोणतेही देणे-घेणे नाही. म्हणूनच आम्ही फेब्रुवारी २०१२मध्ये माघार घेतली होती. भारतीय संघासोबत असलेला करारही आम्हाला संपुष्टात आणायचा होता, पण खेळाडूंसाठी आम्ही हा करार पुढे वाढवला,’’ असेही पत्रकात म्हटले आहे.