धडाकेबाज फलंदाज एरॉन फिंच याने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर पुणे वॉरियर्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजयाची गुढी उभारली. पुण्याच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स व १.२ षटके बाकी राखून पराभव केला. दोन पराभवांनंतर पुण्याचा हा पहिलाच विजय असून राजस्थानची या पराभवामुळे विजयाची हॅटट्रिक हुकली.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पुण्याने अखेर विजयाचे खाते उघडले. विजयासाठी १४६ धावांचे आव्हानास सामोरे जाताना रॉबिन उथप्पा व एरॉन फिंच यांनी सलामीसाठी केवळ १९ मिनिटांमध्ये ३१ चेंडूंत ५८ धावांचा पाया रचला. उथप्पाने तीन चौकार व दोन षटकारांसह ३२ धावा केल्या. राहुल द्रवीडने एका हाताने त्याचा झेल अप्रतिमपणे टिपले. त्यानंतर डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत फिंचने चौफेर फटकेबाजी केली. षटकार मारुनच अर्धशतक टोलविणाऱ्या फिंचने ५३ चेंडूंत ६४ धावा करीत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. त्याच्या या खेळीत तीन षटकार व सहा चौकारांचा समावेश होता. त्याने रॉस टेलरच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.  फिंच बाद झाल्यावर युवराजसिंगने दोन षटकार व दोन चौकारांसह नाबाद २८ धावा करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, भारतीय क्रिकेटची पोलादी भिंत म्हणून बीरुद लाभलेल्या राहुल द्रवीडने कर्णधारास साजेसे अर्धशतक केले, त्यामुळेच राजस्थान रॉयल्सला आयपीएल क्रिकेट सामन्यात पुणे वॉरियर्सपुढेजिंकण्यासाठी १४६   धावांचे आव्हान ठेवता आले. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजी स्वीकारली. भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर राजस्थानच्या कुशल परेरा याला पायचीत करीत पुण्यासाठी झकास सुरुवात केली. मात्र त्यानंतर ग्रेट वॉल असलेला राजस्थानचा कर्णधार राहुल द्रवीड याने अजिंक्य रहाणेच्या साथीत संघाचा डाव सावरला. त्यांनी ६८ चेंडूंमध्ये ८१ धावांची भागीदारी केली. राहुल शर्मा याने अजिंक्यला बाद करीत ही जोडी फोडली. अजिंक्यने २७ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह ३० धावा केल्या. एका बाजूने आश्वासक खेळ करणारा द्रवीड याने अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या या स्पर्धेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे. कलात्मक फलंदाजीचा प्रत्यय दाखविणाऱ्या द्रवीडला युवराजने बाद केले. रॉस टेलर याने एका हाताने हा झेल घेतला. त्याने ४८ चेंडूंमध्ये आठ चौकारांसह ५४ धावा केल्या. त्यानंतर जेम्स फॉल्कनर (नाबाद १९) व ब्रॅड हॉज (नाबाद) यांनी संघास ५ बाद १४५ धावांपर्यंत नेले.

गहुंजे नगरीतून..
सुट्टीमुळे प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद!
गुढी पाडव्याची सुट्टी व अनेक शाळांच्या परीक्षा संपल्यामुळे या सामन्यात प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सामना रात्री आठ वाजता सुरू झाला तरी प्रेक्षकांनी दुपारपासूनच स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी रांगा केल्या होत्या. दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये ध्वज, टी शर्ट्स, टोप्या, आकर्षक पोशाख आदीबाबत चढाओढ दिसून येत होती. राहुल द्रविडचेही अनेक चाहते येथे होते. त्यांनी त्याचे छायाचित्र असलेले छोटे बॅनर्स उंचावत आपला आनंद व्यक्त केला. गर्दीचा लाभ विक्रेत्यांनी घेतला नाही तर नवलच. पाण्याचा छोटा ग्लास दहा रुपयांना मिळत होता.
मांजरही क्रिकेटची चाहती!
सामन्याचे सहावे षटक सुरू होण्यापूर्वी अचानक एक मांजर मैदानात घुसले. जणू काही आपणही क्रिकेटचे चाहते आहोत अशाच थाटात ते मैदानात वावरले. त्यामुळे खेळाडूंप्रमाणेच प्रेक्षकांचीही करमणूक झाली.
युवीला मोठी दाद!
युवराजसिंग गोलंदाजीस आला त्यावेळी प्रेक्षकांनी जल्लोष केला. त्याचे छायाचित्र उंचावत प्रेक्षकांनी त्याचे स्वागत केले.
-मिलिंद पुणेकर

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स २० षटकांत ५ बाद १४५ (राहुल द्रवीड ५४, अजिंक्य रहाणे ३०, ब्रॅड हॉज नाबाद २२, जेम्स फॉल्कनर नाबाद १९, राहुल शर्मा २/१६, युवराजसिंग २/२६)पुणे वॉरियर्स १८.४ षटकांत ३ बाद १४८ (एरॉन फिंच ६४, रॉबिन उथप्पा ३२, युवराजसिंग नाबाद २८)
सामनावीर : एरॉन फिंच