News Flash

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा : गोव्यावर मात करीत पंजाब अंतिम फेरीत

लुधियानाच्या गुरुनानक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रारंभापासूनच धारदार आक्रमणे रचली.

| April 20, 2019 04:53 am

लुधियाना : हरजिंदरसिंगने मारलेल्या विजयी गोलसह पंजाबने पारंपरिक प्रतिस्पर्धी गोव्यावर २-१ अशी मात करीत संतोष फुटबॉल करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

लुधियानाच्या गुरुनानक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रारंभापासूनच धारदार आक्रमणे रचली. पंजाबचा संघ आक्रमणांसाठी प्रामुख्याने सनी आणि जसप्रीतसिंगवर अवलंबून होता. त्यांनी सातत्याने आक्रमक विक्रांतसिंगकडे पासेस पुरवत सातत्यपूर्ण हल्ले सुरूच ठेवले. सामन्याच्या १२व्या मिनिटाला जसप्रीतने उजव्या बाजूने मारलेल्या तिरक्या फटक्याने अचूक वेध घेत पहिला गोल नोंदवला. त्यामुळे गोव्याने अधिक वेगवान प्रतिहल्ले करण्यास प्रारंभ केला. पूर्वार्धात पंजाबने १-० अशी आघाडी कायम राखली. मात्र उत्तरार्धात गोव्याने अधिक नियोजनबद्ध खेळ करीत बरोबरी साधण्याचा प्रारंभ केला.

तरीदेखील सामन्याच्या निर्धारित वेळेच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत त्यांना बरोबरी साधणे शक्य झाले नव्हते. परंतु, अखेरच्या मिनिटात बदली खेळाडू रोनाल्डो ऑलिव्हिएराने एक गोल करीत गोव्याला बरोबरी साधून दिली. त्यानंतर पंजाबने पुन्हा त्यांच्या आक्रमणांची धार वाढवल्याने मोहम्मद आसिफला फ्री किक मिळाली. त्या अखेरच्या क्षणांमधील  फ्री किकच्या फटक्याला हरजिंदरने ्रअप्रतिमपणे नेटमध्ये टाकत दुसरा गोल करीत पंजाबला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 4:53 am

Web Title: punjab beat goa enter in final of santosh trophy
Next Stories
1 आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : सोनिया, सतीश उपांत्यपूर्व फेरीत
2 वेटलिफ्टर्सना ऑलिम्पिक पात्रतेची संधी
3 ipl 2019 : मधल्या फळीकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा -अमरे
Just Now!
X