पटियाला येथील महाराजा भूपिंदरसिंग पंजाब स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीत दिवंगत माजी खेळाडू मिल्खा सिंग यांच्या नावाने स्वतंत्र अध्यासन तयार केले जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चंदीगड येथील मिल्खा सिंग यांच्या निवासस्थानी भेट दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ”मिल्खा यांची कारकीर्द तरुण पिढीला प्रेरणा देईल आणि त्यांचा वारसा लोकांच्या हृदयात जिवंत राहील. त्यांचे निधन हे संपूर्ण देशासाठी मोठी हानी आहे आणि सर्वांसाठी हा एक दुःखद क्षण आहे.”

 

‘फ्लाईंग सिख’ उपाधी

१९६० साली भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होणारे सामने वरकरणी मैत्रीपूर्ण वाटत असले, तरी ते प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना या स्पर्धेत खेळण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिल्खा भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू होते. परंतु त्यांची या स्पर्धेत भाग घेण्याची मूळीच इच्छा नव्हती.

हेही वाचा – किती ते प्रेम..! प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी सुरैश रैनानं गाठलं होतं इंग्लंड!

पण, मिल्खा सिंग यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच होते. अखेर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच त्यांना विनंती केली. नेहरूंच्या आग्रहाखातर आणि केवळ देशावरील प्रेमापोटी त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून मिल्खा यांनी अब्दुल खालिदला हरवले. त्यावेळी पाकिस्तानात भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग सिख’ ही उपाधी दिली.