डावाने पराभव टाळण्यासाठी पंजाबचा लढा

जीवनजोत सिंग, मनदीप सिंगची अर्धशतके

मुंबईच्या संघाने डावाने विजय मिळवून बोनस गुणासह गुणतालिकेत मोलाची भर घालण्याचे मनसुबे आखले आहेत. मात्र पराभव टाळण्यासाठी पंजाबचा जिद्दीने लढा सुरू आहे. शतक हुकलेल्या जीवनजोतने पेटवलेली आशेची ज्योत मनदीप सिंगने हिमांशू चावलाच्या साथीने तेवत ठेवली आहे. पंजाबचा संघ अद्याप १७१ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे सहा फलंदाज बाकी आहेत. त्यामुळे दृष्टिपथात असलेले मुंबईचे ‘सुखस्वप्न’ पंजाब भंग करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शनिवारी मुंबईने तासभर १२ षटके खेळून काढली आणि ८ बाद ५६९ या आव्हानात्मक धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार आदित्य तरेने नाबाद १३७ धावा केल्या. सकाळच्या सत्रात तरे आणि धवल कुलकर्णी (४२) यांनी सातव्या विकेटसाठी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

पहिल्या डावात ४१५ धावांची आघाडी मिळाल्यामुळे पंजाबचा दुसरा डाव सहज गुंडाळून तिसऱ्या दिवशीच विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे मुंबईने ठरवले होते. परंतु पहिल्या डावात जेमतेम १५४ धावांत हाराकिरी पत्करणाऱ्या पंजाबने दुसऱ्या डावात अनपेक्षितपणे आपल्या दर्जाला साजेसा खेळ केला. शार्दुल ठाकूरने मनन व्होराला (६) आणि हरमित सिंगने उदय कौलला (२०) तंबूची वाट दाखवल्यामुळे पंजाबची अवस्था बिकट झाली; परंतु जीवनजोतने मनदीप सिंगच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करून नेटाने किल्ला लढवला. शतकाकडे कूच करणारा जीवनजोत दुर्दैवाने हरमित सिंगच्या चापल्यामुळे धावचीत झाला. त्याने १५९ चेंडूंत १२ चौकारांसह आपली ९१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर आलेल्या युवराज सिंगने (१४) पुन्हा एकदा निराशा केली. मात्र अखेरचा एक तास मनदीपने हिमांशू चावलाच्या (खेळत आहे ३१) साथीने खेळून काढला. रेल्वेविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात शतक झळकावणाऱ्या मनदीपवर आता पंजाबच्या आव्हानाची मदार आहे. मनदीपच्या खात्यावर ८२ धावा जमा असून, यात ११ चौकारांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक

पंजाब (पहिला डाव) : १५४

मुंबई (पहिला डाव) : १२४ षटकांत ८ बाद ५६९ डाव घोषित (श्रेयस अय्यर २००, आदित्य तरे नाबाद १३७, सूर्यकुमार यादव ७८; ब्रेंडर सर्ण ३/८७)

पंजाब (दुसरा डाव) : ७७ षटकांत ४ बाद २४४ (जीवनजोत सिंग ९१, मनदीप सिंग खेळत आहे ८२, हिमांशू चावला खेळत आहे ३१; अखिल हेरवाडकर १/१७, शार्दुल ठाकूर १/५८).