‘बीसीसीआय’चा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पंजाब पोलिसांकडून चौकशी; भारत आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ अनभिज्ञ

नवी दिल्ली :चंडीगडनजीक खेळवण्यात आलेला ट्वेन्टी-२० सामना श्रीलंकेत ऑनलाइन प्रक्षेपित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पंजाब पोलीस या प्रकरणी सट्टेबाजीच्या संशयाची चौकशी करीत आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने मात्र आपला यात कोणताही सहभाग नसून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

चंडीगडपासून १६ किलोमीटर अंतरावरील सावरा गावात २९ जूनला हा सामना खेळवण्यात आल्याचे वृत्त २९ जूनला ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. ‘उवा ट्वेन्टी-२० लीग’मधील या सामन्याचे श्रीलंकेतील युवा क्रिकेट संघटनेच्या हद्दीतील बाडुल्ला शहरात प्रक्षेपण करण्यात आले.

या सामन्याबाबत सट्टेबाजी झाली का, याची चौकशी पंजाब पोलीस करीत आहेत. ‘बीसीसीआय’कडूनही या प्रकरणी चौकशी सुरू असली, तरी श्रीलंका क्रिकेट मंडळाने अशा प्रकारे कोणताही सामना झाला नसल्याचे म्हटले आहे.

‘‘आम्ही चौकशी प्रक्रिया सुरू केली असून, यात कोणाचा सहभाग आहे, हे स्पष्ट झाल्यावर अधिक माहिती देऊ शकू. याबाबत फक्त पोलीस कारवाई करू शकतात. ‘बीसीसीआय’ची समिती म्हणून आम्हाला तो अधिकार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले.

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅश्ले डीसिल्व्हा यांनी श्रीलंकेची या सामन्याला किंवा स्पर्धेला मान्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे डीसिल्व्हा म्हणाले.

श्रीलंका क्रिकेट मंडळ किंवा आमची मान्यता असलेल्या कोणत्याही संघटनेचा यात सहभाग नाही. ‘उवा ट्वेन्टी-२० लीग’ला मंडळाकडून मान्यता घेण्यात आलेली नाही. मात्र भारतामधील काही संकेतस्थळांवरही भारतामधीलल या सामन्याचे धावफलक दाखवण्यात येत होते. या सामन्याचे ठिकाण बाडुल्ला स्टेडियम असेच दाखवत होते.

– श्रीलंका क्रिकेट मंडळ

काही व्यक्ती आमच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेत आहेत. आमच्या संघटनेने अशा कोणत्याही स्पर्धेचे आयोजन केलेले नाही किंवा मान्यता दिलेली नाही. या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी आम्ही श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे केली आहे.

– भगिराधन बालाचंद्रन, उवा क्रिकेट संघटनेचे सहसचिव

ही लीग जर ‘बीसीसीआय’च्या मान्यतेने झाली असती किंवा देशातील क्रिकेटपटूंचा सहभाग असता, तरच त्यावर कारवाईचा अधिकार असेल; परंतु सट्टेबाजीच्या उद्देशाने हा सामना झाल्यास तो फौजदारी गुन्हा ठरेल आणि पोलिसांना कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई करता येईल; पण आम्हाला नाही.

– अजित सिंग, ‘बीसीसीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख