अभिमन्यू पुराणिकने स्पेनमधील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर मोहोर उमटवली. हा किताब मिळविणारा तो पुण्यातील सर्वात लहान खेळाडू आहे.
कँडिडेट मास्टर व माजी जागतिक शालेय विजेत्या अभिमन्यूने गेल्या दोन वर्षांमध्ये प्राग, कोलकाता व मुंबई येथे झालेल्या स्पर्धामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचे तीन निकष पूर्ण केले होते. त्याला या किताबावर शिक्कामोर्तब करण्यासाठी स्पेनमधील स्पर्धेपूर्वी ७२ गुणांची आवश्यकता होती. त्याने स्पेनमधील चार स्पर्धामध्ये ९० मानांकन गुणांची कमाई केली व आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पूर्ण केला.
अभिमन्यू हा सिम्बायोसिस प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत असून त्याला प्रशालेच्या मुख्याध्यापिका लीना चौधरी यांचे सहकार्य लाभले आहे. तो गेली आठ वर्षे आंतरराष्ट्रीय मास्टर व प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तसेच त्याला रशियन मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सराव शिबिरातही भाग घेतला आहे.
अभिमन्यू याने स्पेनमधील स्पर्धामध्ये सोळा आंतरराष्ट्रीय मास्टर्स, सहा ग्रँडमास्टर्स, पाच महिला ग्रँडमास्टर्स यांच्याविरुद्ध उल्लेखनीय विजय मिळविला आहे. त्याने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश प्राप्त केले आहे. तसेच त्याला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केलेल्या अखिल भारतीय लीगमध्येही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याने २०१३ मध्ये तेरा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते.