तिरंदाजीमध्ये प्रदिर्घ काळ खेळाडू घडविण्याचे कार्य करणारी प्रशिक्षका पूर्णिमा महातो आणि महिला हॉकी प्रशिक्षक नरेंद्रसिंग सैनी यांच्यासह पाच जणांची गुरुवारी प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. कुस्ती प्रशिक्षक राज सिंग आणि अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक के. पी. थॉमस यांचीसुद्धा द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. गेली बरेच वष्रे महिला राष्ट्रीय बॉक्सिंग संघाला मार्गदर्शन करणारे महावीर सिंग प्रशिक्षकाचा यात समावेश आहे.
ही यादी केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांच्याकडे आता अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. ऑगस्टमध्येच याबाबतची अधिकृत घोषणा होईल.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि पाच वेळा जागतिक अजिंक्यपद जिंकणारी महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिला महावीर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तथापि, राज सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस आहे आणि सुमारे चार दशके प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सुशील कुमारने त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर समर्थन दिले आहे
महातो यांनी १९९४पासून प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या दिपिका कुमारीलाही त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाची सेवा करणारे सैनी गेली १७ वष्रे प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या चार मुली भारताच्या वरिष्ठ संघात आहेत, तर १० मुली कनिष्ठ संघात आहेत.
केरळचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक थॉमस यांनी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्ज, धावपटू जिन्सी फिलिप्स, आशियाई सुवर्णपदक विजेती शायनी विल्सन यांना मार्गदर्शन केले आहे.
१९८५पासून द्रोणाचार्य पुरस्काराला प्रारंभ झाला. द्रोणाचार्य यांची कांस्य प्रतिकृती आणि पाच लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अ‍ॅथलिट मारिया डी’सुझा, कुस्तीपटू अनिल मान आणि पॅराऑलिम्पिकपटू गिरिराज सिंग यांची ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.