संघालाच नाही तर वैयक्तिक खेळाडूलाही क्रीडा मंत्रालय आर्थिक पाठबळ देऊ शकते, पण त्याकरिता खेळाडू देशासाठी उपलब्ध असायला हवा, असे मत मांडताना क्रीडा मंत्रालयाने टेनिसपटूंवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अव्वल टेनिसपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले नव्हते. लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा, सोमदेव देवबर्मन यांनी आशियाई स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताला या स्पर्धेसाठी दुसऱ्या फळीतील टेनिसपटूंना पाठवावे लागले होते.
क्रीडा मंत्रालयाने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ‘‘पुन्हा एकदा सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सांगू इच्छितो की, वैयक्तिक खेळाडूलाही सरकारकडून अनुदान मिळू शकेल, पण या अनुदानाला पात्र ठरण्यासाठी तो देशासाठी उपलब्ध असायला हवा.’’ याबाबतची सूचना क्रीडा मंत्रालयाने १८ जुलै २०१३ला सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघांना केली होती.
‘‘जर खेळाडू काही अपरिहार्य कारणामुळे खेळू शकणार नसेल तर ती गोष्ट संबंधित राष्ट्रीय क्रीडा महासंघाकडून पडताळून पाहण्यात येईल. हे सारे समजून घेतल्यावर त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल,’’ असे या पत्रकात पुढे म्हटले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या पत्रकामध्ये कोणत्याही खेळाडूचे नाव घेण्यात आलेले नाही. पण तरीही पत्रकाच्या रचनेनुसार क्रीडा मंत्रालयाने टेनिसपटूंना समज देण्याचा प्रयत्न केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘काही वरिष्ठ आणि क्रमवारीत चांगल्या स्थानावर असलेल्या खेळाडूंनी इन्चॉनमधील आशियाई स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. त्या वेळी त्यांनी देशापेक्षा रोख रकमेच्या स्पर्धाना प्राधान्य दिले होते. या खेळाडूंनी आशियाई स्पर्धा गांभीर्याने घेतली नसल्याचे यातून स्पष्ट होते. आशियाई स्पर्धेसारख्या मोठय़ा स्पर्धा चार वर्षांतून एकदाच होत असतात. या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळाडू पदक पटकावतात, तेव्हा देशाला त्यांचा अभिमान वाटत असतो.’’
मानांकित टेनिसपटूंची  संघटनेकडून पाठराखण
आशियाई क्रीडा स्पर्धेऐवजी एटीपी स्पर्धाना प्राधान्य देणाऱ्या तीन टेनिसपटूंची अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) पाठराखण केली आहे. ‘‘लिएण्डर पेस, सोमदेव देववर्मन व रोहन बोपण्णा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुण राखण्यासाठी आशियाई स्पर्धेऐवजी एटीपी स्पर्धेला प्राधान्य दिले होते. या खेळाडूंबाबत शासनाने गैरसमज करून घेतला आहे,’’ असे एआयटीएचे सरचिटणीस भरत ओझा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘या खेळाडूंनी डेव्हिस चषक लढतीत सर्बियाविरुद्ध चिवट झुंजीनंतर पराभव स्वीकारला होता. त्यामुळे हे खेळाडू देशासाठीही खेळत असतात हे सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय गुण त्यांच्यासाठी ग्रँड स्लॅमसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात.’’
‘‘आशियाई स्पर्धेत पदक मिळविल्यास या खेळाडूंची भरपूर आर्थिक कमाई झाली असती, मात्र खेळाडूंनी आर्थिक फायद्याचा विचार केला नाही. हे तीन खेळाडू  नसतानाही भारताच्या अन्य टेनिसपटूंनी सात पदकांपैकी पाच पदकांची कमाई केली आहे,’’ असे ओझा यांनी सांगितले.