जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या पी.व्ही सिंधूने नव्या वर्षांतल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपसह अजय जयराम, आदित्य प्रकाश, बी. साईप्रणीथ यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूने दक्षिण कोरियाच्या किम ह्य़ो मिनवर २१-१४, २१-१२ अशी मात केली. पुढच्या लढतीत सिंधूची लढत पाचव्या मानांकित थायलंडच्या पॉर्नटिप बूरानप्रार्स्टुकशी होणार आहे.
पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने इंडोनेशियाच्या ख्रिस्ती जोनाटनवर १३-२१, २२-२०, २१-१२ असा विजय मिळवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कश्यपने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर त्याच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. नव्या हंगामात आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटवण्यासाठी कश्यप आतूर आहे. अन्य लढतींमध्ये अजय जयरामने पहिल्या लढतीत इंडोनेशियाच्या डिऑनसियुस हेओम रुमबाकाला २३-२१, १७-२१, २४-२२ असे नमवले. दुसऱ्या लढतीत इंडोनेशियाच्या महबूब थोमी अझिझानचा २१-९, २१-१५ असा धुव्वा उडवला. आदित्य प्रकाशने इंडोनेशियाच्या फिकरी इहसांडी हडमाडीवर २१-१७, १८-२१, २१-१३ असा विजय साकारला. मलेशियाच्या टेक झि सोने शुभंकर डेवर २१-१९, १७-२१, २१-१० अशी मात केली.
बी. साईप्रणीतने तैपेईच्या लिन चिआ ह्य़ुसानचा २२-२०, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत जपानच्या केंटा कझुनो आणि कझुशी यामाडा जोडीने तरुण कोना आणि संतोष रावुरी जोडीवर २१-९, २१-१४ अशी मात केली. मिश्र दुहेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या फ्रान कुर्निआवान-कोमला देवी जोडीने तरुण कोना- एन.सिक्की रेड्डी जोडीवर २३-२१, २२-२० असा विजय मिळवला.

सय्यद मोदी स्पर्धेत सायना खेळणार
लखनौ येथे होणाऱ्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेत सायना नेहवाल खेळणार आहे. गेल्या वर्षी तीन जेतेपदे पटकावणारी सायना घरच्या मैदानावर जेतेपदासह नव्या वर्षांची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. स्पेनची कॅरोलिन
मारिनही या स्पर्धेत खेळणार आहे.