सायना, साईप्रणीत, श्रीकांत सलामीलाच गारद

जकार्ता : इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र गतविजेती सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. सायनासह बी. साईप्रणीत, किदम्बी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

पाचव्या मानांकित सिंधूला जपानच्या आया ओहोरीविरुद्ध विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. पहिला गेम सिंधूने १४-२१ गमावला होता. मात्र नंतरचे दोन गेम २१-१५, २१-११ असे जिंकत सिंधूने विजय नोंदवला. आतापर्यंत ओहोरी आणि सिंधूची १० वेळा लढत झाली आहे. मात्र सिंधू कधीही ओहोरीकडून पराभूत झालेली नाही. सिंधूची दुसऱ्या फेरीत जपानच्या सायाका ताकाहाशीविरुद्ध लढत होणार आहे. सायाकाने ५० मिनिटे रंगलेल्या पहिल्या फेरीत सायना नेहवालचा पराभव केला. या लढतीत सायनाने पहिला गेम २१-१९ असा जिंकला होता. मात्र नंतरचे दोन गेम तिने १३-२१, ५-२१ असे गमावले.

पुरुष एकेरीच्या अन्य लढतींमध्ये श्रीकांत आणि साईप्रणीतला गेल्या आठवडय़ात मलेशिया मास्टर्सच्या पहिल्या फेरीतही पराभव पत्करावा लागला होता.

१२व्या मानांकित श्रीकांतला इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्ताविटोकडून २१-१८, १२-२१, १४-२१ पराभव पत्करावा लागला. साईप्रणीतला आठवा मानांकित चीनच्या शीयूकीकडून २१-१६, १८-२१, १०-२१ पराभूत व्हावे लागले. सौरभ वर्माचादेखील चीनच्या लू गुआंग झूकडून २१-१७, १५-२१, १०-२१ पराभव झाला.