News Flash

सिंधूचा थरारक विजय

पी. व्ही. सिंधूने विश्वविजेत्या कॅरोलिनला नमवत कारकीर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद केली.

सायना नेहवालसह अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान आधीच संपुष्टात आल्याने सिंधू भारताचे एकमेव आशास्थान होते.

विश्वविजेत्या कॅरोलिन मारिनला नमवून अंतिम फेरीत

दुखापतीतून पूर्णपणे सावरल्याचा प्रत्यय घडवत पी. व्ही. सिंधूने विश्वविजेत्या कॅरोलिनला नमवत कारकीर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद केली. कौशल्याची सखोल परीक्षा पाहणाऱ्या लढतीत सिंधूने मारिनवर २१-१५, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवत  प्रथमच सुपर सीरिज स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सायना नेहवालसह अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान आधीच संपुष्टात आल्याने सिंधू भारताचे एकमेव आशास्थान होते.

सिंधूची मारिनविरुद्धची कामगिरी १-१ अशी होती. या दोघींमध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत मारिनने विजय साकारला होता. मात्र या आकडेवारीचा जराही परिणाम होऊ न देता सिंधूने थरारक विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने ५-३ अशी आघाडी घेतली. हीच लय कायम राखत सिंधूने १४-११ अशी आघाडी राखली. पल्लेदार रॅली आणि भेदक स्मॅशच्या फटक्यांचा सिंधूने खुबीने वापर केला. १६-१३ अशा स्थितीतून सिंधूने सलग चार गुणांची कमाई केली. मारिनच्या शैलीदार खेळाला त्याच स्वरुपाच्या खेळाने जोरदार प्रत्युत्तर देत पहिला गेम नावावर केला.

विश्रांतीनंतर मारिनने आमूलाग्र सुधारणा करत ११-६ अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर चिवटपणे खेळ करत सिंधूने १६-१८ अशी पिछाडी भरून काढली. सिंधूच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत मारिनने आगेकूच केली. क्रॉसकोर्ट, ड्रॉप आणि बॉडीलाइन स्मॅशच्या फटक्यांचा वापर करत मारिनने सिंधूला निष्प्रभ केले.

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही एकेका गुणासाठी अटीतटीचा मुकाबला रंगला. ६-६ अशा बरोबरीतून मारिनने खेळ उंचावत दमदार आघाडी घेतली. मात्र मारिनच्या आघाडीने व्यथित न होता सिंधूने आपला संघर्ष सुरूच ठेवला. मारिनच्या स्वैर फटक्यांचा फायदा उठवत आणि स्वत:च्या खेळातली अचूकता वाढवत सिंधूने पिछाडी भरून काढली. मारिनने सिंधूचा मॅचपॉइंट वाचवत पुनरागमनाचे संकेत दिले. मात्र पुढच्याच रॅलीत अफलातून फटक्यासह सिंधूने मारिनचे आव्हान संपुष्टात आणले. अंतिम लढतीत सिंधूसमोर चीनच्या ली झेरूईचे आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 4:18 am

Web Title: pv sindhu beats world champion carolina
Next Stories
1 बीसीसीआयच्या कार्यकारिणी बैठकीत चेन्नई व राजस्थानचे भवितव्य ठरणार
2 भारताची ऑस्ट्रेलियावर मात; आज ब्रिटनशी अंतिम सामना
3 इंग्लंडचा विजय हुकला; कसोटी अनिर्णीत
Just Now!
X