नवी दिल्ली : बॅडमिंटनमधील भारताची नामांकित खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनेसुद्धा बुधवारी सध्या ट्विटरवर मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या ‘मी टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.

बॉलीवूडमध्ये प्रामुख्याने अनेक अभिनेत्री याविषयी आपले मंत मांडत असताना आता क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडूंचीही यात भर पडू लागली आहे. मंगळवारी ज्वाला गट्टानेही तिच्यावर पुलेला गोपिचंद यांच्याकडून मानसिक छळ करण्यात आला आहे, असा आरोप केला होता.

सिंधू म्हणाली, ‘‘ज्यांनी त्यांच्यावर झालेल्या कोणत्याही प्रकाराच्या अत्याचाराचा व छळाचा प्रसंग लोकांसमोर मांडला आहे, त्या सर्वाचा मला खरोखरच अभिमान वाटतो.’’ या मोहिमेअंतर्गत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळावा, अशी इच्छाही सिंधूने यावेळी व्यक्त केली.

तुझ्यासोबत असा कोणता प्रसंग घडला आहे का, याविषयी विचारण्यात आल्यावर सिंधू म्हणाली, ‘‘मला माझ्या प्रशिक्षक किंवा वरिष्ठांविषयी माहिती नाही. पण कारकीर्द सुरू झाल्यापासून सुदैवाने माझ्यासोबत तरी असा कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.’’