चँगझोऊ (चीन) : विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूला चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगने तिचा पराभव केला.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने ५८ मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिला गेम जिंकून आघाडी घेतली, परंतु पुढील दोन गेममध्ये ती तिला टिकवता आली नाही.

पुरुष एकेरीत बी. साईप्रणीतने ४८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात लु गुआंग झूचा २१-१९, २१-१९ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सात्त्विकला दुहेरी धक्का

* पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावरील सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीच्या ३३ मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या चौथ्या मानांकित ताकेशी कामुरा आणि केईगो सोनोडा जोडीने सात्त्विक-चिरागचा २१-१९, २१-८ असा पराभव केला. या जोडीकडून सात्त्विक-चिराग जोडीचा हा वर्षभरातील दुसरा पराभव आहे.

* मिश्र दुहेरीत सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी -अश्विनी पोनप्पा जोडीला युकी कानेको आणि मिसाकी मॅटसुटोमोचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. युकी-मिसाकी जोडीने २१-११, १६-२१, २१-१२ असा विजय मिळवला.

* महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डीचे आव्हान संपुष्टात आले. जपानच्या मिटासी मॅटसुटोमो आणि अयाका ताकाहाशी जोडीने अश्विनी-सिक्की जोडीला २१-१२, २१-१७ असे नमवले.