News Flash

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, सायनाची शानदार सुरुवात

बासेल (स्वित्र्झलड) : दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणारी पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली.

| August 22, 2019 01:48 am

बासेल (स्वित्र्झलड) : दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणारी पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली. सिंधूने बुधवारी चायनीज तैपेईच्या पाय यू पो हिच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत तिसऱ्या फेरीत मजल मारली, तर सायनाने नेदरलँड्सच्या सोराया डे विच आयबेर्गेन हिला सहज धूळ चारली.

बुधवारी पहिल्यांदाच कोर्टवर उतरत सिंधूने पाय यू पो हिच्यावर ४३ मिनिटांत २१-१४, २१-१५ अशी सहज मात करत आगेकूच केली. सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या नवव्या मानांकित बेईवान झँग हिचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर आठव्या मानांकित सायनाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत दुसऱ्या फेरीचा सामना २१-१०, २१-११ असा जिंकला. सायनाला पुढील फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफिल्ड हिच्याशी लढत द्यावी लागेल.

पाचव्या मानांकित सिंधूने पहिल्या गेममध्ये ५-५ अशी बरोबरी साधल्यानंतर ११-७ अशी आघाडी घेतली होती. सिंधूच्या सहजसुंदर खेळापुढे पाय यू पो हिचा निभाव लागत नव्हता. सिंधूच्या फटक्यांना प्रत्युत्तर देताना पाय यू पो हिचे फटके नेटवर जात होते. पाय यू पो हिच्या चुकांचा फायदा उठवत सिंधूने सहा गुणांची आघाडी घेत पहिला गेम सहजपणे आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्येही सिंधूने ६-१ अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर पाय हिने आपली रणनीती बदलली. तिने सिंधूला प्रदीर्घ रॅली करण्यावर भर दिला. त्यामुळे तिला ५-७ अशी पिछाडी भरून काढता आली. सिंधूकडूनही चुका होऊ लागल्यामुळे पाय हिला ११-१० अशी आघाडी घेता आली. पण त्यानंतर सिंधूने आपला खेळ उंचावत सहा गुणांच्या फरकाने विजयश्री मिळवली.

अश्विनी-सिक्की गारद

अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या भारताच्या महिला दुहेरीतील आघाडीच्या जोडीने कडवी लढत दिली. पण चीनच्या सातव्या मानांकित डू येई आणि ली यिन हुई जोडीकडून त्यांना २२-२०, २१-१६ असे पराभूत व्हावे लागले. पुरुष दुहेरीत, मनू अत्री आणि बी. सुमिर रेड्डी या जोडीला चीनच्या सहाव्या मानांकित हॅन चेंग काय आणि झोऊ हाओ डोंग यांनी २१-१६, २१-१९ असे हरवले.

मेघना-पूर्विशा पराभूत

महिला दुहेरीत भारताच्या मेघना जक्कमपुडी आणि पूर्विशा राम यांना जपानच्या आठव्या मानांकित शिहो टानाका-कोहारू योनेमोटो यांच्याकडून ८-२१, १८-२१ अशी हार पत्करावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:48 am

Web Title: pv sindhu enter into third round of bwf world championships zws 70
Next Stories
1 मालिकेत बरोबरी साधण्याचा न्यूझीलंडचा निर्धार
2 Pro Kabaddi 7 : पुणेरी पलटणची बंगळुरु बुल्सवर मात
3 Title Sponsor म्हणून Paytm आणि BCCI यांच्यात करार, मोजले तब्बल ***कोटी रुपये
Just Now!
X