सायना नेहवालच्या अनुपस्थितीत अन्य भारतीय बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी कामगिरी करत आहेत, याचा प्रत्यय आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने येत आहे. युवा पी.व्ही.सिंधू आणि ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने उपांत्य फेरीत वाटचाल करत भारताचे पदक पक्के केले आहे.
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने तासभर चाललेल्या मुकाबल्यात थायलंडच्या ओंगबुमरुंगपान बुसाननवर १४-२१, २१-१३, २१-१० असा विजय मिळवला. या विजयासह सिंधूने बुसाननविरुद्धच्या आतापर्यंतच्या तिन्ही लढतींत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. पुढच्या फेरीत सिंधूचा मुकाबला चीनच्या सिझियान वांगशी होणार आहे. सायना नेहवालने २०१०मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
पुरुषांमध्ये आरएमव्ही गुरुसाईदत्तला पराभवाला सामोरे जावे लागले. चुरशीच्या लढतीत चीनच्या लिअू कईने गुरुसाईदत्तवर २२-२४, २१-९, २१-१३ अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने गुरुसाईदत्तची पदकाची संधी हुकली. दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने मलेशियाच्या अ‍ॅन्सकेली अमेलिआ अलिसिआ आणि सूंग फि चो जोडीवर २१-१२, २१-१२ असा विजय मिळवला.