ग्वांगझोऊ : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला बुधवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक टूर फायनल्स स्पर्धेसाठी महिला एकेरीच्या अ-गटात कडवे आव्हान असेल. मात्र या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या समीर वर्माला पुरुष एकेरीची बाद फेरी गाठता येऊ शकेल.

दुबईत मागील वर्षी झालेल्या जागतिक टूर फायनल्स स्पर्धेत उपविजेतेपद मिळवण्याची किमया साधणाऱ्या सिंधूला अ-गटात गतविजेती अकानी यामागुची (जपान), जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानावर विराजमान असणारी ताय झू यिंग (चायनीज तैपई) आणि बेवेन झँग (अमेरिका) यांचे कडवे आव्हान असेल.

गेल्या महिन्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकणाऱ्या समीरच्या ब-गटात जागतिक क्रमवारी अव्वल स्थानावर असलेला केंटो मोमोटा (जपान), टॉमी सुगियार्तो (इंडोनेशिया) आणि कँटाफोन वँगचारोईन (थायलंड) यांचा समावेश आहे.

जागतिक बॅडमिंटनमधील आठ सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात आणि प्रत्येक गटात अव्वल ठरणारे दोन खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सिंधू यंदा तिसऱ्यांदा या स्पर्धेत सहभागी होत असून, बुधवारी यामागुचीशी तिचा सलामीचा सामना होणार आहे. यामागुचीविरुद्ध तिची विजय-पराजयाची आकडेवारी ९-४ अशी आहे. हे चारही पराभव यंदाच्या हंगामामधील पाच सामन्यांमध्ये सिंधूच्या वाटय़ाला आले आहेत.

२३ वर्षीय सिंधूला आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ताय झू यिंगचेही आव्हान जड ठरू शकेल, कारण मागील सहाही लढतींमध्ये ताय झू हिने सिंधूला हरवले आहे. झँगविरुद्ध सिंधूची कामगिरी ३-३ अशी आहे.

जागतिक टूर फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारा समीर हा किदम्बी श्रीकांतनंतर भारताचा दुसरा पुरुष बॅडमिंटनपटू आहे. त्याला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणे कठीण नसेल. सुगियार्तो आणि वँगचारोईन यांच्याविरुद्धची त्याची कामगिरी १-१ अशी आहे. समीरला मोमोटाला हरवणे कठीण जाईल. स्विस खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत समीरने त्यालाही नमवण्याची किमया साधली होती.

तुम्हाला हे माहीत आहे का?

जागतिक टूर फायनल्स स्पर्धेला गेल्या वर्षीपर्यंत सुपर सीरिज फायनल्स म्हटले जायचे. त्या वेळी सायना नेहवाल सात वेळा या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे, तर २०११ मध्ये तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. २००९ मध्ये ज्वाला गट्टा आणि व्ही. दिजू जोडीने मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले होते.