मलेशियन ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे आणि या वर्षांअखेपर्यंत जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याचे माझे ध्येय आहे, असे भारताची उदयोन्मुख खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने सांगितले.
सिंधू हिला जागतिक क्रमवारीत सध्या तेरावे स्थान आहे. मलेशियन स्पर्धा जिंकल्यानंतर सोमवारी येथे तिचे आगमन झाले. त्यावेळी गोपीचंद बॅडमिंटन अकादमीतील खेळाडू व कर्मचारी वर्गाने तिचे भव्य स्वागत केले.
आपल्या विजेतेपदाचे श्रेय गोपीचंद यांना देत सिंधू म्हणाली, गोपीचंद यांच्यामुळेच माझी कारकीर्द घडत आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित खेळाडू लिउ झुरेई हिच्याविरुद्ध मिळविलेला विजय माझ्यासाठी संस्मरणीय आहे. तिच्याविरुद्ध माझा आक्रमक खेळ खूपच प्रभावी ठरला.
सिंधूच्या कामगिरीविषयी गोपीचंद म्हणाले, सिंधू हिने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. मात्र ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करण्यासाठी तिला कसून मेहनत करावी लागणार आहे.