थिरूवनंतपुरम : भारताची पहिली जगज्जेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आता पुढील वर्षी टोक्योमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यासाठी तिचा खडतर सराव सुरू झाला आहे.

‘‘माझे ध्येय हे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे आहे, पण हे सहजगतीने साध्य करता येणार नाही. त्यासाठी मला अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे. हरणे आणि जिंकणे हा खेळाचाच भाग असतो. काही वेळेला अपयश तर काही वेळेला यश तुम्हाला मिळत असते. डेन्मार्क खुली आणि पॅरिस खुली या स्पर्धा ऑलिम्पिकआधी महत्त्वाच्या आहेत. ऑलिम्पिक पात्रतेच्या या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे सिंधूने सांगितले.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. अंतिम फेरीत सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिच्याकडून पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. ‘‘टोक्यो ऑलिम्पिकसाठी मला चाहत्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. या वेळी मी सुवर्ण पदकावर नाव कोरेन, अशी आशा आहे,’’ असेही सिंधू म्हणाली.