भारताची आघडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही नुकत्याच दोन मोठ्या स्पर्धा खेळून मायदेशी परतली आहे. या दोन स्पर्धांमध्ये तिला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. एका स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले, तर दुसऱ्या स्पर्धेत ती उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाली. परंतु, आता मात्र सिंधू आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत काही निवांत क्षण अनुभवत आहे.

३० जुलैपासून बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरु होणार आहे. त्याची सिंधू तयारी करत आहे. परंतु या दरम्यानच्या वेळेत सिंधूने ट्विटवर चक्क स्वतः हेल्मेट घातलेला फोटो पोस्ट केला आहे. बॅडमिंटनपटू असलेल्या सिंधूला हेल्मेट घालण्याची वेळ का आली? ती कोणता इतर खेळ तर खेळ तर खेळण्याचा विचार करत नाही ना…असा जर मनात विचार येत असेल तर तसं अजिबात नाही. सिंधूने आपली सामाजिक जबाबदारी ओळखत आणि सामाजिक जाणीव जपत हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या वर कॅप्शनमध्ये ‘माझ्या सर्व बंधूनो, कृपया दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर नक्की करा’ असा एक मोलाचा संदेश सिंधूने आपल्या तमाम बंधुरायांना दिला आहे.

दरम्यान, ‘हेल्मेट वापरा’ ही मोहीम सुरु करणाऱ्या तेलंगणाच्या खासदार कविता कल्वकुंतला राव यांचेही सिंधूने अभिनंदन केले आहे. याबरोबरच सिंधूने #Sisters4change आणि #giftahelmet हे हॅशटॅगही ट्विटमध्ये वापरत कविता यांच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.