चांगझुओ (चीन) : भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे, मात्र त्यासाठी त्यांना स्वत:च्याच १०० टक्के तंदुरुस्तीबाबत असलेली समस्या हाच मुख्य अडथळा जाणवणार आहे.

सिंधूला नुकत्याच झालेल्या जपान खुल्या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वेळी तिला प्रामुख्याने दमछाकीमुळेच अपेक्षेइतके अव्वल कौशल्य दाखवता आले नव्हते. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात तिला डेन्मार्क खुल्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद व्हावे लागले होते. त्यानंतरची तिची ही खराब कामगिरी आहे. २३ वर्षीय सिंधूला यंदा राष्ट्रकुल क्रीडा, जागतिक अजिंक्यपद व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये रौप्यपदक मिळाले होते. त्याखेरीज तिने भारत खुली व थायलंड खुली या दोन्ही स्पर्धामध्येही उपविजेतेपद मिळवले होते. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने २०१६ मध्ये येथे अजिंक्यपद मिळवले होते. त्यानंतर तिला विविध स्पर्धामध्ये विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. येथे तिला हाँगकाँगच्या चेउंग निगानयेईशी झुंजावे लागणार आहे.

भारताच्याच सायना नेहवालला येथे पहिल्याच फेरीत दक्षिण कोरियाच्या सुंग जिहुआनशी खेळावे लागेल. सायना व सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली तर या दोन्ही खेळाडूंमध्येच लढत होण्याची शक्यता आहे.

जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल स्थानचा खेळाडू श्रीकांतला येथे पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या रासमुस गेमकेाशी झुंज द्यावी लागणार आहे. त्याचा सहकारी एच. एस. प्रणॉयची पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या निग कालोंग अँगुलशी गाठ पडेल. दुहेरीत सात्त्विकसाईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांना मलेशियाच्या गोह व्हीशेम व तानवेई किओंग यांच्याशी खेळावे लागेल. मनू अत्री व बी. सुमेध रेड्डी यांचा तैवानच्या लिओ मिन चुन व सुचिंग हेंगशी सामना होणार आहे.

महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांची कोरियाच्या किम सो येआँग व काँग ही याँग जोडीश लढत होईल. मिश्रदुहेरीत सात्त्विक व अश्विनी यांच्यापुढे इंग्लंडच्या माकरेस एलीस व लॉरेन स्मिथ यांचे आव्हान आहे, तर प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांची जर्मनीच्या मार्विन एमिल सिडेल व लिंडा एफलरशी गाठ पडेल.