Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत महिला एकेरीच्या गटात भारताच्या पी व्ही सिंधूचे आव्हान कोरियाच्या सुंग जी ह्यून हिने २६-२४, २२-२० असे संपुष्टात आणले. पहिला गेम अत्यंत अटीतटीचा झाला. या गेममध्ये दोघीही हार मानायला तयार नव्हत्या. सुरुवातीला सिंधूने २ तर सुंग जी ह्यून हिने ६ गुण कमावले होते. त्यानंतर सिंधूने झुंज देत ६-६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १८-१३ अशा गुणसंख्येवर असताना सिंधूने पुन्हा संघर्ष केला आणि २०-२० अशी बरोबरी साधली. अखेर २४-२४ अशी बरोबरी असताना सुंग जी ह्यून हिने दोन गुण कमावत पहिला गेम २६-२४ असा जिंकला. दुसरा गेमही अटीतटीचा झाला. पण तो गेमही सिंधूने गमावला आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सिंधूने स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. तिने थायलंडच्या नीचाऑन जिंदापॉल हिला २१-१५, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले होते. हा सिंधूचा तिच्यावरील चौथा विजय ठरला होता. पहिला गेम सिंधूने २१-१५ असा मोठ्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये तिला पराभवाला सामोरे जावे लागले. जिंदापॉल हिने दमदार पुनरागमन करत पहिल्या गेममधील पराभवाचा जास्त फरकाने वचपा काढला. त्यामुळे तिसरा गेम हा निर्णायक ठरला. या गेममध्ये दोघींमध्ये सामना अटीतटीचा झाला. अखेर सिंधूने मोक्याच्या क्षणी गुण कमावत जिंदापॉल हिला ४ गुणांच्या फरकाने पराभूत करत सामना जिंकला होता.