रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने चीनच्या चेन युफेईला सरळ सेटमध्ये पराभूत केले. स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

सिंधू आणि चीनच्या युफेईमध्ये उपांत्य फेरीची लढत झाली. ४८ मिनिटांच्या लढतीत सिंधूने बहारदार खेळ करत युफेईला २१-१३, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. ऑलिम्पिक आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूने गाठली नव्हती. मात्र, सिंधूने ही कमाल करून दाखवली आहे.

उपात्यंपूर्व फेरीत सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या चीनच्या सून यू हिला सरळ सेटमध्ये पराभूत करून कांस्य पदक निश्चित केले होते. यू हिच्यावर २१-१४, २१-९ अशा गुण फरकाने मात करत तिने उपांत्य फेरी गाठली होती. अंतिम फेरीत सिंधू आणि जपानची नोजोमी ओकुहारा भिडणार आहे. ओकुहारा हिने शनिवारी भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सायना नेहवाल हिला या स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.