News Flash

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा सहज, सायनाचा संघर्षमय विजय

पुरुष एकेरीत कश्यपला तीन गेममध्ये रंगलेल्या लढतीत हार पत्करावी लागली

| April 12, 2019 02:28 am

कश्यपचे आव्हान संपुष्टात; समीर, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

सिंगापूर : पी. व्ही. सिंधूने शानदार विजयासह सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. परंतु सायना नेहवालला दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पोर्नपावी चोचूवाँगविरुद्ध विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. पुरुषांमध्ये समीर वर्मा आणि किदम्बी श्रीकांतने आगेकूच केली आहे, तर पारुपल्ली कश्यपचे आव्हान संपुष्टात आले आहे.

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चौथ्या मानांकित सिंधूने ३९ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावरील मिआ ब्लिशफेल्डचा २१-१३, २१-१९ असा पाडाव केला. डेन्मार्कच्या मिआविरुद्ध सिंधूने हा सलग दुसरा विजय संपादन केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूची आता चीनच्या काय यानयानशी गाठ पडणार आहे. कायने २०१७मध्ये जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

सिंधूने पहिल्या गेममध्ये ३-० अशी सुरुवात केल्यानंतर आरामात वर्चस्व राखले. दुसऱ्या गेममध्ये सिंधूला कायने उत्तम प्रतिकार करीत ८-८ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधू ११-१५ अशी पिछाडीवर होती. परंतु त्यातून सावरत तिने १७-१७ अशी बरोबरी साधली आणि नंतर गेमसह सामना जिंकला. गेल्या महिन्यात सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत करणाऱ्या थायलंडच्या चोचूवाँगविरुद्ध सायनाला परतफेड करता आली. हा रंगतदार सामना चोचूवाँगने २१-१६, १८-२१, २१-१९ असा जिंकला. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाची पुढील फेरीत जपानच्या द्वितीय मानांकित नोझोमी ओकुहाराशी गाठ पडणार आहे.

पुरुष एकेरीत कश्यपला तीन गेममध्ये रंगलेल्या लढतीत हार पत्करावी लागली. चीनच्या चौथ्या मानांकित चेन लाँगने कश्यपला २१-९, १५-२१, २१-१६ असे नामोहरम केले.समीरने आपली विजयी घोडदौड कायम राखताना चीनच्या लू गुआंगझूला २१-१५, २१-१८ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याची तैपेईच्या द्वितीय मानांकित चोऊ टीन चेन किंवा डेन्मार्कच्या यान ओ जॉर्गेनसेनशी गाठ पडणार आहे. सहाव्या मानांकित श्रीकांतने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्तियन सॉलबर्ग व्हिटिंगहसचा २१-१२, २३-२१ असा पराभव केला.

प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावरील हाँगकाँगच्या टँग चून मॅन आणि से यिंग सूएटचा २१-१७, ६-२१-२१-१९ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 2:28 am

Web Title: pv sindhu saina nehwal registered victory in singapore open
Next Stories
1 क्रीडा शिबिरे मुलांची, जबाबदारी पालकांची
2 प्रो कबड्डी लीग : अंधाऱ्या चाळीतून प्रो कबड्डीत चमकणार ‘अजिंक्य’तारा!
3 पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला हिलरी शिष्यवृत्ती
Just Now!
X