02 March 2021

News Flash

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा दिमाखदार विजय

दुखापतीतून सावरत खेळणाऱ्या पी.व्ही. सिंधूने जकार्ता, इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली झेरुईवर मात करत दिमाखदार पुनरागमन केले.

| August 14, 2015 06:03 am

श्रीकांत, प्रणॉयला पराभवाचा धक्का
दुखापतीतून सावरत खेळणाऱ्या पी.व्ही. सिंधूने जकार्ता, इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली झेरुईवर मात करत दिमाखदार पुनरागमन केले. सिंधूच्या बरोबरीने सायना नेहवाल आणि ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने आपापल्या लढती जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सिंधूने याआधी २०१३ आणि २०१४मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. यंदा या स्पर्धेतली आणखी एक लढत जिंकल्यास सिंधू पदकांची हॅट्ट्कि साजरी करू शकते. ११व्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी आणि तृतीय मानांकित असलेल्या ली झेरुईवर २१-१७, १४-२१, २१-१७ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत सिंधूसमोर स्युंग जि ह्य़ुआनचे आव्हान असणार आहे.
पहिल्या गेममध्ये सिंधूने ५-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी तिने सातत्याने वाढवली. १६-१७ अशी गुणसंख्या असताना सिंधूने सलग तीन गुण पटकावत २०-१६ अशी आघाडी घेतली. आणखी एक गुण जिंकत सिंधूने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये झेरुईने लौकिकाला साजेसा खेळ करत झंझावाती आक्रमणासह २१-१४ अशी बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने ११-६ अशी दमदार आघाडी घेतली. मात्र झेरुईने चिवटपणे खेळ करत १४-१४ अशी बरोबरी केली. यानंतर सिंधूने सलग चार गुण मिळवत महत्त्वपूर्णोघाडी घेतली. या आघाडीच्या बळावरच सिंधूने तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या सायनाने १४व्या मानांकित जपानच्या सायाका ताकाहाशीवर २१-१८, २१-१४ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये चाचपडत खेळणाऱ्या सायनाने दुसऱ्या गेममध्ये तडाखेबंद स्मॅशेस आणि नेटजवळून सुरेख खेळ करत तिने सामना जिंकला.
महिला दुहेरीत ज्वाला-अश्विनी जोडीने संघर्षपूर्ण लढतीत जपानच्या रेईका केकिवा आणि मियुकी माइडाला २१-१५, १८-२१, २१-१९ असे नमवले. पहिल्या गेममध्ये या जोडीने सहज आगेकूच केली. दुसऱ्या गेममध्ये मात्र केकिवा आमि माइडाच्या शैलीदार खेळासमोर त्या निष्प्रभ ठरल्या. तिसऱ्या गेममध्ये अटीतटीच्या मुकाबल्यात ज्वालाने नेटजवळ टिच्चून खेळ करत तर अश्विनीने दमदार स्मॅशेसचा प्रभावीपणे उपयोग करत सरशी साधली.
पुरुषांमध्ये हाँगकाँगच्या ह्य़ु युनने चुरशीच्या लढतीत श्रीकांतवर १४-२१, २१-१७, २३-२१ अशी मात केली. पहिला गेम गमावलेल्या श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये झुंजार खेळ करत पुनरागमन केले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये युनने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. व्हिक्टर अ‍ॅक्सेलनने प्रणॉयचा २१-१६, १९-२१, २१-१८ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 6:03 am

Web Title: pv sindhu stuns xuerui to reach quarter final of world badminton championship
टॅग : Badminton,Pv Sindhu
Next Stories
1 विराट कोहलीमध्ये मॅराडोनाला पाहतो -गांगुली
2 पिंक पँथर्स तुपाशी, पुणे तळाशी
3 भूपिंदरला जिवापेक्षा कबड्डी मोलाची
Just Now!
X