भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या पायाला दुखापत झाली आहे. तिच्या पायाच्या हाडाला दुखापत झालेली नाही असे समजते आहे. तिच्या पायाची MRI चाचणीही करण्यात आली आहे. पायाचा हाडाला किंवा इतर कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये अशी माहिती सिंधूचे वडिल पी.व्ही. रामण्णा यांनी दिली.

पुढच्या महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धा अर्थात कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. ४ एप्रिलपासून ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाचं नेतृत्व बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूकडे देण्यात आलेलं आहे. सुरुवातीच्या दिवशी रंगणाऱ्या स्वागत सोहळ्यात सिंधू पथसंचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व करणार आहे. मात्र नेमक्या या स्पर्धेच्या काही दिवस आधीच पी. व्ही सिंधूच्या पायाला दुखापत झाली आहे.

मंगळवारी अॅकेडमीत सराव करताना अचानक सिंधूच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने काळजीचे कारण नाही असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. २०१४ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सिंधूने सुवर्ण पदक जिंकले होते. यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधू चांगली कामगिरी करेल असा विश्वास तिच्या चाहत्यांना आणि तिला स्वतःलाही आहेच. एक ते दोन दिवसांच्या आरामानंतर सिंधू पुन्हा सराव करू लागेल असे सांगण्यात आले आहे.