टोक्यो : जगज्जेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी ऐतिहासिक ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. भारताच्या सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के करताना जपानच्या अकाने यामागुचीला धूळ चारली.

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या २६ वर्षीय सिंधूने ५६ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत यामागुचीला २१-१३, २२-२० असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. सिंधूचा हा यामागुचीविरुद्ध १२वा विजय ठरला. शनिवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात सिंधूची चायनीज तैपईच्या ताय झू-यिंगशी गाठ पडेल.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने यामागुचीविरुद्ध संथ सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये ४-६ अशा पिछाडीवर असताना मात्र सिंधूने खेळ उंचावला आणि २१-१३ अशा फरकाने गेम खिशात टाकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे १५-१० अशी आघाडी असताना यामागुचीने गुणांचा सपाटा लावत थेट २०-१८ अशी गेम पॉइंटच्या दिशेने वाटचाल केली. परंतु सिंधूने अनुभवाच्या बळावर यामागुचीला चुका करण्यास भाग पाडले आणि सलग चार गुण मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सिंधूची उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी ताय झू-यिंग ही विश्वातील अग्रगण्य बॅडमिंटनपटू आहे. सिंधूविरुद्ध तिची आकडेवारी १३-५ अशी आहे. मात्र ताय झू-यिंगच्या तुलनेत सिंधूने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकही गेम गमावलेला नाही. त्यामुळे उभय खेळाडूंतील या लढतीला एकप्रकारे अंतिम फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पहिला गेम जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास फार बळावला. दुसऱ्या गेममध्ये १८-२० अशी पिछाडीवर पडल्यानंतरही प्रशिक्षकांनी मला धीर दिला. त्यामुळे मला सलग चार गुण मिळवता आले. पदकाच्या निर्धारानेच मी टोक्योत आली असून यंदा भारतासाठी बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक जिंकूनच मी मायदेशी परतेन.

– पी. व्ही. सिंधू