घोटय़ाच्या दुखापतीतून सावरत वर्षअखेरीस होणाऱ्या सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेसाठी पात्र होणे, हे उद्दिष्ट असल्याचे भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने सांगितले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आगामी चार स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी प्रयत्नशील असल्याचे कश्यपने स्पष्ट केले.
‘‘सुपर सीरिज फायनल्सचे उद्दिष्ट वास्तवदर्शी आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल आठ खेळाडूंत धडक मारायची आहे. आगामी चार स्पर्धामध्ये मला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल. या स्पर्धाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तरी मला मजल मारावी लागेल,’’ असे कश्यपने सांगितले.
सुपर सीरिज प्रीमिअर दर्जाच्या स्पर्धा डेन्मार्क आणि चीनमध्ये होणार आहेत तर फ्रान्स आणि हाँगकाँग येथे सुपर सीरिज स्पर्धा होणार आहेत. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये कश्यपच्या खेळात सातत्याचा अभाव जाणवला होता. खेळातील त्रुटी दूर करत, दुखापतीवर मात करत पुनरागमन करण्याचे आव्हान कश्यपसमोर असणार आहे. ‘‘आयबीएलमध्ये श्रीकांतविरुद्धच्या सामन्यात मला दुखापत झाली. ती आता जवळपास बरी झाली आहे. सरावाला काही दिवसांपूर्वीच मी सुरुवात केली आहे. खेळताना वेदना होतात. त्यामुळे मी पूर्णभरात सध्या खेळू शकत नाही, मात्र येत्या काही दिवसांतच दुखापत पूर्ण बरी होईल,’’ असे कश्यपने सांगितले.