बहुप्रतिक्षित IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले आहे. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. पण यंदाच्या IPLमध्ये प्रेक्षक मात्र सामने पाहण्यासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. याचा स्पर्धेतील क्रिकेटच्या दर्जावर परिणाम होईल का? यावर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने मत व्यक्त केले आहे.

पाहा व्हिडीओ-

“यंदाच्या IPL सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती नसेल ही बाब नक्की आहे. पण मला चाहत्यांना सांगावंसं वाटतं की तसे असेल तरीही चाहत्यांना प्रत्येक सामना पाहायला आधीइतकीच मजा येईल. कदाचित यंदाच्या IPLमध्ये खेळपट्ट्या धीम्या गतीच्या गोलंदाजांना मदत करणाऱ्या ठरू शकतील, पण त्याबद्दल आता बोलणे योग्य नाही. पण एक मात्र नक्की, प्रेक्षकांविना खेळण्यात येणाऱ्या सामन्यात ऊर्जेचा किंवा दर्जाचा अभाव दिसून येईल असा विचारही करू नका. कारण खेळाचा दर्जा अजिबात खालावणार नाही असा मला विश्वास आहे”, असे लक्ष्मणने हैदराबाद संघाने रिलीज केलेल्या व्हिडीओत स्पष्ट केले.