विश्वचषक हॉकी स्पर्धा २०१८

उपांत्यपूर्व फेरीत आज नेदरलँड्सशी सामना

कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने साखळीमधील दिमाखदार कामगिरीनिशी बाद फेरी गाठली आहे. परंतु ४३ वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भारताचा हा प्रवास आता मुळीच सोपा नसेल. गुरुवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतापुढे बलाढय़ नेदरलँड्सचा पहिला अडथळा असणार आहे. नेदरलँड्सने भारतावर नेहमीच वर्चस्व गाजवले असल्याने यावेळी तरी अपयशाची कोंडी फोडण्यात यजमान यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

भारताने याआधी १९७५मध्ये विश्वचषक हॉकी स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी भारताने प्रथमच विजेतेपदालाही गवसणी घातली होती. मात्र त्यानंतर या इतिहासाची पुनरावृत्ती भारताला अद्याप करता आलेली नाही. याचप्रमाणे विश्वचषक स्पध्रेत भारताने आतापर्यंत नेदरलँड्सला एकदाही हरवलेले नाही. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सहा लढतींपैकी पाच लढती नेदरलँड्सने जिंकल्या आहेत, तर एक लढत बरोबरीत सुटली आहे. त्यामुळेच इतिहास बदलण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.

दोन्ही संघांची कामगिरी आणि क्रमवारीत यात तसे फारशे अंतर नाही. जागतिक हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर भारत पाचव्या स्थानावर आहे. याआधी दोन्ही संघ चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.

गटसाखळीमध्ये दोन्ही संघांनी गोलवर्षांव केला आहे. भारताने १२ गोल केले आणि तीन गोल त्यांच्याविरुद्ध झाले, तर नेदरलँड्सने १८ गोल नोंदवले आणि प्रतिस्पध्र्यानी त्यांच्याविरुद्ध पाच गोल केले.

‘‘मागील लढतींचा प्रभाव नेहमीच असतो. नेदरलँड्स हा एक अव्वल दर्जाचा संघ असून त्यांच्याविरुद्ध भारताची कामगिरी नेहमीच सुमार झाली आहे. मात्र यंदा आम्ही इतिहास बदलण्यासाठी सज्ज झालो आहोत,’’ असे मनप्रीतने सांगितले.

आतापर्यंत स्पर्धेत प्रत्येकी ३-३ गोल करणाऱ्या ललित उपाध्याय व सिमरनजीत सिंगवर भारताची प्रामुख्याने मदार आहे. त्याचबरोबर हरमनप्रीत सिंग व मनदीप सिंग यांनीदेखील संघासाठी वेळोवेळी उपयुक्त कामगिरी केली आहे. याचप्रमाणे कर्णधार बिली बॅकर, सिव्ही व्हॅन अ‍ॅस, जेरोईन हर्ट्झबर्गर, मिर्को प्रुइज्सर, रॉबर्ट केम्परमॅन, थिअरी ब्रिंकमॅन यांच्यावर नेदरलँड्सची प्रमुख मदार असेल. या महत्त्वपूर्ण लढतीसाठी कलिंगा स्टेडियम गुरुवारी खच्चून भरलेले असेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संघावर अपेक्षांचे ओझेसुद्धा तितकेच असेल.

सँडेर डी विनची माघार

नेदरलँड्सचा प्रमुख बचावपटू सँडेर डी विनने दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घेतली आहे. कॅनडाविरुद्धच्या बाद फेरीतील लढतीत विनच्या मांडीचा स्नायू अधिक ताणला गेल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला होता. दुखापत गंभीर असल्यास त्याला संपूर्ण स्पर्धेलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

३३

भारत आणि नेदरलँड्समध्ये आतापर्यंत १०५ सामने झाले असून, यापैकी भारताने ३३ व नेदरलँड्सने ४८ सामने जिंकले आहेत.

भारत-नेदरलँड्स विश्वचषकात आतापर्यंत ६ वेळा आमनेसामने आले असून, यापैकी पाच लढती नेदरलँड्सने जिंकल्या आहेत, तर एक लढत बरोबरीत सुटली आहे.

मायदेशातील चाहत्यांसमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. त्यामुळे आमच्यापेक्षा अधिक दडपण भारतीय संघावर असेल. आम्ही नेहमीच आमच्या वेगाने खेळण्याचा प्रयत्न करतो.

-बिली बॅकर, नेदरलँड्सचा कर्णधार

अर्जेटिनाला नमवून इंग्लंड उपांत्य फेरीत

भुवनेश्वर : विश्वचषक हॉकी स्पध्रेची उपांत्य फेरी गाठताना इंग्लंडने रोमहर्षक लढतीत अर्जेटिनाचा ३-२ असा पाडाव केला. इंग्लंडने सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली असून, जर्मनी आणि बेल्जियम संघांमधील विजेत्याशी त्यांची गाठ पडणार आहे. इंग्लंडकडून मिडलेटन बॅरी (२७व्या मिनिटाला), कॅलनॅन विल (४५व्या मि.) आणि मार्टिन हॅरी (४९व्या मि.) यांनी मैदानी गोल नोंदवले, तर अर्जेटिनाकडून पिलॅट गोन्झालोने (१७व्या आणि ४८व्या मि.) पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन्ही गोल साकारले.