भारतीय संघाच्या कर्णधारपदी विराजमान असलेल्या विराट कोहलीला आज जगाच्या कानाकोपऱ्यात ओळख प्राप्त झाली आहे. क्रिकेट या खेळाचा जिथे जिथे उल्लेख होतो त्या सर्व ठिकाणी विराटच्या नावाचाही उल्लेख होतो, असं म्हणायला हरकत नाही. अगदी कमी वयात भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळत आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात नावलौकिक मिळवणाऱ्या विराटला आजवर बऱ्याच पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे फक्त माध्यमं आणि क्रीडारसिकांनीच त्याची दखल घेतली असून, शिक्षण विभागानेही त्याची दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे. असं म्हणण्याचं कारण, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विराटविषयी एक प्रश्न विचारण्यात आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

बसला ना तुम्हालाही धक्का? सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे ही गोष्ट सर्वांसमोर आली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पश्चिम बंगालमधील दहावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विराट कोहलीवर आधारित निबंध लिहिण्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.

मुर्शिदाबाद येथील एका शाळेतील शमिम अख्तर या विद्यार्थीनीने विराटविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आपण फारत उत्सुक होतो, अशी प्रतिक्रिया दिली. ‘त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही अगदी आनंदात लिहिलं. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाइल याची आम्हाला अपेक्षाच नव्हती. पण, आमच्या आदर्शस्थानी असलेल्या खेळाडूविषयी आम्ही भरभरुन लिहिलं’, असं ती म्हणाली.

वाचा : विराटनं भेट दिलेली बॅट घेऊन ‘ती’ पोहोचली भारतात

विराटविषयी विचारण्यात आलेल्या त्या प्रश्नाला कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहा गुणांसाठी या प्रश्नाचं उत्तर लिहिलं. ज्यामध्ये त्याच्याविषयीची माहिती आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारा निबंध लिहिण अपेक्षित होतं.