दोन वर्षांच्या कलंकित काळानंतर दिल्ली न्यायालयाकडून अखेर न्याय मिळाल्याने भारताचा क्रिकेटपटू एस. श्रीशांत, मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण आणि राजस्थानचा ऑफ-स्पिनर अजित चंडिला यांना आपल्या भावना आवरणे कठीण गेले. आता पुनरागमन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया या तिघांनीही व्यक्त केली. मात्र दिल्ली न्यायालयाने दिलासा दिल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्यावरील आजीवन बंदी कायम ठेवत असल्याचे स्पष्ट केल्यामुळे त्यांचे पुनरागमन कठीण झाले आहे.
‘‘कोणतीही शिस्तभंगाची कारवाई किंवा घेतलेला निर्णय हा बीसीसीआयचा स्वतंत्र स्वरूपाचा असतो. बीसीसीआयने स्वतंत्र चौकशी प्रक्रियेंतर्गत कारवाई करून हा निर्णय दिला होता. त्यात बदल होणार नाही,’’ असे बीसीसीआयने पत्रकाद्वारे सांगितले.
२०१३च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातून श्रीशांत, चव्हाण आणि चंडिला यांची पतियाळा हाऊस न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर तिघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले. चौकशीदरम्यान तिघेही तुरुंगात होते.

या क्षणी माझ्या आनंदाला पारावार नाही. लवकरच सराव सुरू करीन. प्रशिक्षण सुविधांसंदर्भात बीसीसीआयची लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी मला तंदुरुस्ती आणि कामगिरी सिद्ध करता येईल. देवाच्या कृपेने न्याय मिळाला. क्रिकेट खेळण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. मी सर्वात आधी एक क्रिकेटपटू आहे. या कठीण काळात बीसीसीआयचे पाठबळ आमच्यासोबत होते. आता केरळमध्ये परतून पुन्हा सराव करण्यासाठी उत्सुक आहे. मला अश्रूंवर नियंत्रण ठेवणे अतिशय अवघड जात आहे.
एस. श्रीशांत

माझा न्यायप्रक्रियेवर आणि देवावर विश्वास आहे. आता पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी बीसीसीआय मला देईल, अशी आशा आहे. मी माझ्या वकिलांशी चर्चा करून आता पुढील निर्णय घेईन. माझ्या आयुष्यातील अवघड काळात माझे कुटुंब माझ्यासोबत होते. दोन वर्षांनी आता मी शांतपणे झोपू शकणार आहे.
अजित चंडिला

आमची निर्दोष मुक्तता केल्याचे सध्या तरी आम्हाला कळते आहे. आता क्रिकेटमध्ये परतण्यासाठी मी उत्सुक आहे. आता योजनापूर्वक पुनरागमनाविषयी विचार करीत आहे. एक क्रिकेटपटू म्हणून हे आव्हानात्मक होते. परंतु या कठीण कालखंडात कुटुंबीय आणि मित्रांनी मला धीर दिला. क्रिकेटमध्ये नक्की परतेन.
अंकित चव्हाण