भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनचे दमदार शतक आणि कर्णधार विराटचे अर्धशतक याच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने इंग्लंडला ४८२ धावांचे अंतिम लक्ष्य दिले. रविचंद्रन अश्विन याने दमदार कामगिरी करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. १९६६ नंतर तब्बल ५५ वर्षांनी इंग्लंडविरूद्ध एखाद्या खेळाडूने एकाच कसोटीत ५ बळी टिपले आणि शतक झळकावलं. याआधी, सर गॅरी सोबर्स यांनी १९६६ साली हेडिंग्लेच्या मैदानावर हा पराक्रम केला होता. त्यानंतर आज अश्विनने या विक्रमाला गवसणी घातली.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात सकाळच्या सत्रात भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा (८), रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शिकार केली. कर्णधार विराट कोहलीसोबत अश्विनने ९६ धावांची भागीदारी केली. पण ६२ धावांवर विराट माघारी परतला. त्यानंतर अश्विनने तळाच्या फलंदाजांना घेऊन १०६ धावांची खेळी केली. त्याने १४ चौकार आणि एक षटकार खेचला.

४८२ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डॉम सिबली (३) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाठोपाठ रॉरी बर्न्सदेखील २५ धावांवर अश्विनचा बळी ठरला. तर नाईट वॉचमन जॅक लीचने शून्यावर अक्षरला आपली विकेट बहाल केली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत डॅन लॉरेन्स (१९) आणि जो रूट (२) यांनी खेळपट्टी सांभाळली. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे तर भारताला ७ गड्यांची आवश्यकता आहे.