दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही या विजयात मोलाचा वाटा उचलला. रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात ७ बळी घेत भारताला मोलाची आघाडी मिळवून देण्यात मदत केली. यादरम्यान आश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३५० बळी घेणारा गोलंदाजही ठरला. आश्विनचा एकेकाळचा साथीदार हरभजन सिंहने आश्विनचं कौतुक करत तो कसोटीत ५०० बळी घेऊ शकतो असं म्हटलं आहे.

“सध्याच्या घडीला ६०० बळींबद्दल मी थोडा साशंक आहे. मात्र त्याच्यासाठी ४१७ हा आकडा आता जवळ आहे. (हरभजनच्या नावावर कसोटीत ४१७ बळी जमा आहेत) आश्विन सध्या ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता, तो लवकरच ५०० बळी घेऊ शकतो. ६०० बळी घेण्यासाठी त्याला शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असावं लागणार आहे, असं झाल्यास तो कितीही बळी घेऊ शकतो.” India Today वाहिनीशी बोलत असताना हरभजन सिंह बोलत होता.

विशाखापट्टणम कसोटीत मिळवलेल्या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याचसोबत आयसीसी कसोटी क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं आवश्यक आहे. दरम्यान या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी पुण्याच्या गहुंजे मैदानावर सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे