करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात सध्या चिंतेचं वातावरण आहे. दररोज महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जावू नये अशा सचूना देण्यात आल्या आहेत. क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विननेही या लढ्यात एक महत्वाचं पाऊल उचललं आहे.

आश्विनने आपल्या ट्विटर हँडलवरुन आपलं नाव हटवत, lets stay indoors India असं नाव ठेवलं आहे. अधिकाधिक लोकांनी घरात राहून सरकारी यंत्रणांना मदत करावी यासाठी आश्विनने हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धाही रद्द होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आयसीसीचं कॅलेंडर पाहता हा पर्यायही उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. मे महिन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याचसोबत यंदा आशिया चषकाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.