अहमदाबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवलं आहे. अश्विन यानं पहिल्या डावांत तीन आणि आता दुसऱ्या डावांतही तिसरा बळी घेत इंग्लंडच्या संघाचं कंबरडं मोडलं आहे. दुसऱ्या डावांत तिसरा बळी घेत अश्विन यानं कसोटी क्रिकेटमध्ये ४०० व्या बळींची नोंद केली आहे. अश्विन यानं २१ हजार २४२ चेंडूमध्ये ४०० बळी घेतले आहेत.

तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विननं हा माईलस्टोन गाठला. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा एकूण १७ वा आणि भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपील देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या भारतीय गोलंदाजांनी हा विक्रम केला आहे. २०११ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अश्विन यानं ७७ व्या कसोटी सामन्यात ४०० बळींचा टप्पा पार केला आहे.

४०० बळी घेत अश्विन यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वात जलद ४०० बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विननं ७७ डावांत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यानं ७२ डावांत हा भीमपराक्रम केला आहे. आर. हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटीत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर रंगना हेरथ यानं ८४ व्या कसोटीत हा पराक्रम केला आहे.

कसोटीमध्ये सर्वाधिक ४०० बळी घेणारे गोलंदाज भारतीय आहेत. चार भारतीय गोलंदाजांनी ४०० बळी घेण्याची किमया केली आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी दोन गोलंदाजांनी ४०० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका गोलंदाजानं ४०० बळी घेतले आहेत.