भारतीय कसोटी संघाचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. गेल्या दशकात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आश्विनच्या नावे जमा झाला आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंच्या आगमनानंतर आश्विनला आपलं वन-डे आणि टी-२० संघातलं स्थान गमवावं लागलं. कसोटी क्रिकेटमध्येही त्याचं स्थान निश्चीत नसताना त्याने केलेली कामगिरी वाखणण्याजोगी आहे.

रविचंद्रन आश्विनने ५६४ बळी घेत पहिलं स्थान पटकावलं आहे. यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन ५३५ बळींसह दुसऱ्या, स्टुअर्ट ब्रॉड ५२५ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही आश्विनच्या या कामगिरीची दखल घेत त्याचं कौतुक केलं आहे.

२०११ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या आश्विनने मोठ्या कालावधीपर्यंत भारताच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन आश्विन या भारताच्या फिरकी जोडगोळीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे. सध्या आश्विन कसोटी संघात खेळतो.