IPL 2019मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलरला मंकडिंग करत धावचीत केलं होतं. ६९ धावांवर खेळत असलेला जोस बटलर त्यावेळी नॉन स्ट्राईकवर उभा होता. चेंडू टाकण्याआधीच तो धाव घेण्यासाठी पुढे गेला, त्यावेळी अश्विनने संधी साधत त्याला ‘मंकडिंग’ केलं. या मुद्द्यावरून नंतर बराच वादंग निर्माण झाला. आता IPL 2020मध्ये अश्विन दिल्लीच्या संघाकडून खेळणार आहे. पण दिल्लीकडून खेळताना असं काही करण्याची त्याला अजिबात परवानगी नसणार आहे.

अश्विन दिल्लीकडून यंदा खेळणार आहे. त्याला ‘मंकडिंग’ची परवानगी देणार नसल्याचं मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टींगने स्पष्ट केलं आहे. “मी त्याच्याशी याविषयी बोलणार आहे. आम्ही भेटल्यानंतर पहिलं काम हेच असेल. कदाचित तो मला त्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करेल, पण ‘मंकडिंग’च्या माध्यमातून गडी बाद करणं खेळभावनेला साजेसं नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघात कोणालाही ही परवानगी नसेल”, असे पॉन्टींग म्हणाला.

IPL 2020 : दिल्लीकडून खेळताना आश्विनला ‘मंकडिंग’ची परवानगी नाही – रिकी पाँटींग

पॉन्टींगच्या याच मुद्द्यावरून दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये विसंवाद दिसून आला. माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने पॉन्टींगच्या वक्तव्यावरून त्यालाच प्रश्न विचारला. “(खेळभावनेच्या दृष्टीने विचार करणाऱ्या पॉन्टींगला मला असं विचारायचं आहे की) जर गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच जर फलंदाज या नियमाचा गैरफायदा घेत क्रीजमधून बाहेर येत असेल तर ही बाब खेळभावनेला धरून आहे का?”, असं त्याने ट्विट केलं.

अश्विनच्या मंकडिंगच्या मुद्द्यावर गेल्या हंगामात मोठं वादळ निर्माण झालं होतं. क्रिकेटमधील अनेक तज्ञ्ज मंडळींनी यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. परंतु अखेरीस अश्विनने केलेली बाब ही क्रिकेटच्या नियमाला धरूनच आहे असे सांगण्यात आले होते. परंतु मंकडिंग हे खेळभावनेच्या विरोधात असल्याचे अनेकांचे मत होते.