नवी दिल्ली : करोनामुळे सध्या संपूर्ण क्रीडा विश्वावर संकट ओढावले आहे. परंतु याद्वारे पृथ्वीतलावरील सर्व नागरिकांनी अधिक जबाबदार व्हावे, अशीच निसर्गाची इच्छा असावी, असे मत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली.

३३ वर्षीय अश्विनने बुधवारी ‘ट्विटर’वर करोनासंबंधित पोस्ट टाकून याद्वारे सर्वानी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ‘‘हा काळ नागरिकांसाठी परीक्षा पाहणारा आहे. निसर्ग तसेच समाजाने मानवाला आजपर्यंत दिलेल्या अनेक अमूल्य गोष्टींची आपल्याला किती जाणीव आहे, आपल्यातील माणुसकी अद्याप शिल्लक आहे की नाही, हे सर्व या खडतर काळातून निदर्शनास येईल. त्यामुळे आपण सर्वानी संयम बाळगून या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे,’’ असे अश्विन म्हणाला.

‘‘गेल्या आठवडय़ात मी चेन्नईतील काही स्थळांची भेट घेतली. परंतु येथील नागरिकांमध्ये अद्यापही करोनाविषयी आवश्यक ती जागरुकता निर्माण झालेली नाही, असे मला त्यावरून आढळले. तुम्ही जितके स्वत:ला गर्दीपासून दूर ठेवाल, तितके तुमच्या तब्येतीसाठीच सोयीस्कर ठरेल,’’ असेही अश्विनने सांगितले.