भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने नुकतेच आपल्या फेसबुक पेजवर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. चेन्नईतील एका रुग्णालयाच्या नेत्रदान मोहिमेत हातभार लावत कसोटी क्रमवारीतील या अव्वल मानांकित गोलंदाजाने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत असे अश्विनच्या पत्नीचे स्वप्न होते. आपल्या पत्नीचे स्वप्न सत्यात उतरल्याचे अश्विनने म्हटले असून नेत्रदानाची जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रीत करणे हे त्याच्या फाऊंडेशनचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे त्याने म्हटले.

आम्ही नुकतेच अश्विन फाऊंडेशन सुरू केले आहे. नेत्रदानाची जनजागृतीचे आमचे लक्ष्य असून मी नेत्रदानाचा निर्णय घेऊन या अभियानाची सुरूवात केली आहे. इतरही या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतील अशी आशा आहे, असे अश्विनने ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.  अश्विनच्या फाऊंडेशनची सुरूवात ७ जानेवारी रोजी झाली. क्रिकेटचे मैदान गाजवणारा अश्विन सामाजिक क्षेत्रात देखील तितकाच सक्रिय आहे. अश्विन फाऊंडेशन सोबतच अश्विनची स्वत:ची ‘जेन-नेक्स्ट’ नावाची क्रिकेट अकादमी देखील आहे. २०१० साली अश्विनने चेन्नईत या अकादमीची स्थापना केली.

वाचा: कसोटीमध्ये अश्विन, जडेजा गोलंदाजांमध्ये अव्वल; फलंदाजांमध्ये कोहली द्वितीय

आर. अश्विन नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत सध्या वेळ व्यतित करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अश्विनला संघात स्थान देण्यात आले आहे. अश्विनने कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली २०१० साली एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मध्ये तर २०११ साली कसोटी संघात पदार्पण केले होते. कसोटीत २४८, आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४२ आणि ट्वेन्टी-२० मध्ये ५२ बळी घेतले आहेत.

वाचा: विराट आमुची ध्येयासक्ती, पण..

आयसीसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत अश्विनला कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे. तर रविंद्र जडेजा दुसऱया स्थानावर आहे. अश्विन आणि जडेजा जोडीने २०१६ या वर्षात न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अफलातून कामगिरी केली होती. भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० तर इंग्लंडविरुद्ध ४-० असा दमदार विजय प्राप्त केला होता. भारतीय संघाने लागोपाठ १८ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.