संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली.  बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १८ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह एकूण पाच फिरकी गोलंदांजांना संधी देण्यात आलीय. १८ पैकी तीन खेळाडू राखीव असून राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहरचा समावेश आहे. बीसीसीआयने टी २० विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केल्यानंतर क्रिकेटमधील जाणकार आणि चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. या संघामध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलं आहे. मागील चार वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर असणाऱ्या अश्विनला संधी देत सध्या चांगली कामगिरी करणाऱ्यांना डावलल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र संघामध्ये स्थान मिळाल्यानंतर अश्विनने एक खास ट्विट करत अवघ्या दोन शब्दांमध्ये मला भावना मांडायच्या आहेत असं म्हणत घरातील एका भिंतीचा फोटो शेअर केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

अश्विन सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. मात्र त्याला मालिकेमधील पहिल्या चारही कसोटी सामन्यांमध्ये अंतिम संघामध्ये कर्णधार विराट कोहलीने स्थान दिलेलं नाही. अश्विनची निवड न केल्यामुळे विराटने त्याच्या चाहत्यांची नाराजी ओढावून घेतली होती. मात्र अश्विनशिवाय खेळताना भारताने ओव्हल कसोटी जिंकून दाखवल्यानंतर टी-२० विश्वचषकाच्या संघात अश्विनला स्थान मिळणार का यासंदर्भात चर्चा सुरु होती. अश्विनने यापूर्वी अखेरचा टी २० सामना जून २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध खेळला होता. ३४ वर्षीय अश्विननं आतापर्यंत भारतासाठी ४६ टी २० सामन्यात ५२ गडी बाद केले आहेत. यात ८ धावा देऊन चार गडी बाद केल्याचं त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. २०१७ नंतर मर्यादीत षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या अश्विनला देण्यात आलेल्या संधीमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी

असं असलं तरी अश्विनने एक खास ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “२०१७ साली हे वाक्य भिंतीवर लिहून घेण्याआधी मी माझ्या डायरीमध्ये ते लाखो वेळा लिहिलं. एखादं वाक्य वाचून त्याचं कौतूक करणं आणि त्याचा खऱ्या आयुष्यात अवलंब करण्याला फार महत्व असतं. माझी सध्याची स्थिती सांगायला या क्षणी बोलायला दोनच शब्द आहेत, आनंद आणि आभार,” अशा कॅप्शनसहीत अश्विनने घरातील एका भिंतीचा फोटो शेअर केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

ही भींत अश्विनच्या घरातील असल्याचं सांगण्यात येत असून त्यावर एक वाक्य लिहिलेलं आहे. हे वाक्य अश्विनचंच असून त्यात तो म्हणतो, “प्रत्येक बोगद्याच्या शेवटी एक प्रकाश असतोच. मात्र त्या बोगद्यामधून प्रवास करणाऱ्या ज्या ज्या व्यक्तींना त्या प्रकाशावर विश्वास असतो तेच तो पाहण्यासाठी शेवटपर्यंत राहतात. (बोगद्यातून प्रवास पूर्ण करतात.)” या वाक्यामधून अश्विनने आपण मागील बऱ्याच काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर होतो मात्र आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती हे सूचित करण्याचा प्रयत्न केलाय. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून तो ९ हजार ७०० हून अधिक जणांनी तो शेअर केलाय.

राखीव खेळाडूंची यादी पाहून चाहत्यांना बसला धक्का

अश्विनच्या सिलेक्शनबरोबरच राखीव खेळाडूंची यादीही चांगलीच चर्चेत आहे. हर्षा भोगले, आकाश चोप्रा यासारख्या क्रिकेटच्या जाणकारांनी बीसीसीआयने शार्दूल ठाकूर आणि दीपक चहरला संघात स्थान न देता राखीव खेळाडू म्हणून निवडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. शार्दूलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली आणि गोलंदाजीतही छाप पाडताना दुसऱ्या डावात रॉरी बर्न्‍स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा अडसर दूर केला.  शार्दूल ठाकूर सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेमध्ये चमकदार कामगिरी करतोय. नुकत्याच ओव्हलवर झालेल्या सामन्यात शार्दूलने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भन्नाट कामगिरी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं.

दीपक चहरनेही भारताने नुकताच केलेल्या श्रीलंकन दौऱ्यादरम्यान चांगली फलंदाजी केली होती. असं असतानाही या दोघांना संघाबाहेर ठेवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पृथ्वीची गेल्या वर्षभरातील कामगिरी लक्षवेधी होती. ‘आयपीएल’मध्ये दुखापत झालेल्या आक्रमक श्रेयसची कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधू शकली नाही.

नक्की वाचा >> T20 World Cup: निवृत्तीनंतरही टीम इंडियामध्ये धोनीचं ‘सिलेक्शन’; ‘या’ निर्णयामागील रजनीकांत कनेक्शन माहितीय का?

विराटकडे लक्ष

टी २० विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच धोनी वगळता इतर कोणताही खेळाडू भारताचे नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच टी-२० विश्वचषक स्पर्धा असणार आहे. भारतीय संघाने २००७ नंतर टी २० विश्वचषक जिंकलेला नाही. इतकच नाही तर २०१३ नंतर भारताने आतापर्यंत आयसीसीचा एकही चषक जिंकलेला नाही. दुसरीकडे विराट कोहली त्याच्या नेतृत्वामध्ये अद्याप आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेला नाही. त्यामुळेच विराटच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. आधी ही मालिका भारतात खेळवली जाणार होती. मात्र करोना रुग्णसंख्या लक्षात घेता ही मालिका ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान आयोजित करण्यात आलीय.

नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा

भारतीय संघ

’  फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव

’  यष्टीरक्षक : ऋषभ पंत, ईशान किशन

’  अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा

’  वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

’  फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

’  राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर