आपल्या जादूई फिरकीच्या तालावर नाचवत आर. अश्विनने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यजमान श्रीलंकेचा चांगलाच पाहुणचार घेतला. तब्बल सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत त्याने श्रीलंकेचे कंबरडे मोडले आणि भारताला सामन्यावर वर्चस्व मिळवून द्यायची सुवर्णसंधीही दिली. अश्विनच्या अचूक माऱ्याने श्रीलंकेच्या धावांना वेसण घातली आणि त्यांचा पहिला डाव १८३ धावांमध्येच संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल भारताने पहिल्या दिवसअखेर २ बाद १२८ अशी मजल मारली असून ते अजूनही ५५ धावांनी पिछाडीवर आहेत.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण भारताच्या गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. इशांत शर्मा आणि वरुण आरोन या वेगवान गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा मारा करत दोन्ही सलामीवीरांना अवघ्या १५ धावांत माघारी धाडले. कर्णधार विराट कोहलीने १२ व्या षटकात अश्विनच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना सळो की पळे करून सोडले. अखेरची कसोटी मालिका खेळणाऱ्या कुमार संगकारासहित (५) अन्य तीन फलंदाजांना बाद करत त्याने उपाहारापर्यंत श्रीलंकेची ५ बाद ६५ अशी दैना उडवली होती.
उपहारानंतरच्या दुसऱ्याच षटकात इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने दिनेश चंडिमलचा पाच धावांवर असताना सोपा झेल सोडला आणि तोच महागात पडला. त्यानंतर मात्र कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि चंडिमल यांनी श्रीलंकेच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. मॅथ्यूजने या वेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६४ धावा केल्या, तर चंडिमलने जीवदानाचा फायदा उचलत ९ चौकारांच्या जोरावर ५९ धावा केल्या. अखेर अश्विननेच ही जोडी फोडत मॅथ्यूजला माघारी धाडले. मॅथ्यूज बाद झाल्यावर ठरावीक फरकाने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आला. अश्विनने या वेळी नेत्रदीपक कामगिरी करत ४६ धावांमध्ये सहा बळी टिपण्याची किमया साधली, आतापर्यंतच्या कारकीर्दीतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अश्विनला अमित मिश्राने दोन बळी मिळवत चांगली साथ दिली.
माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताने २८ धावांमध्ये दोन फलंदाज गमावल्यानंतर त्यांचीही श्रीलंकेसारखी अवस्था होईल, असे वाटत होते. पण सलामीवीर शिखर धवन आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२८ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला स्थिरस्थावर केले. धवनने या संधीचा फायदा उचलत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ५३ धावांची खेळी साकारली, तर कोहलीनेही सात चौकारांच्या जोरावर नाबाद ४५ धावा केल्या.

धावफलक
’श्रीलंका (पहिला डाव) : दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. इशांत ९, कुशल सिल्व्हा झे. धवन गो. आरोन ५, लहिरु थिरिमाने झे. रहाणे गो. अश्विन १३, कुमार संगकारा झे. रहाणे गो. अश्विन ५, अँजेलो मॅथ्यूज झे. रोहित गो. अश्विन ६४, जेहान मुबारक झे. राहुल गो. अश्विन ०, दिनेश चंडिमल झे. रहाणे गो. मिश्रा ५९, धमिक्का प्रसाद पायचीत गो. अश्विन ०, रंगना हेराथ त्रि. गो. अश्विन २३, थरींडू कौशल झे. रोहित गो. मिश्रा ०, नुवान प्रदीप नाबाद ०, अवांतर (बाइज १, लेग बाइज १, नो बॉल ३) ५, एकूण ४९.४ षटकांत सर्व बाद १८३.
’बाद क्रम : १-५, २-१५, ३-२७, ४-५४, ५-६०, ६-१३९, ७-१५५, ८-१७९, ९-१७९, १०-१८३.
’गोलंदाजी : इशांत शर्मा ११-३-२०-१, वरुण आरोन ११-०-६८-१, आर. अश्विन १३.४-२-४६-६, अमित मिश्रा ६-१-२०-२, हरभजन सिंग ८-१-१७-०.
’भारत (पहिला डाव) : के. एल राहुल पायचीत गो. प्रसाद ७, शिखर धवन खेळत आहे ५३, रोहित शर्मा पायचीत गो. मॅथ्यूज ९, विराट कोहली खेळत आहे ४५, अवांतर (लेग बाइज ६, वाइड २, नो बॉल ६) १४, एकूण ३४ षटकांत २ बाद १२८.
’बाद क्रम : १-१४, २-२८.
’गोलंदाजी : धमिक्का प्रसाद ७-०-२२-१, नुवान प्रदीप ८-१-३२-०, अँजेलो मॅथ्यूज ४-१-१२-१, थरींडू कौशल ८-०-४१-०, रंगना हेराथ ७-१-१५-०.