स्वेताना पिरोनकोव्हाचा पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

दुसऱ्या मानांकित अग्निझेका रडवानस्काला सात वर्षांनंतर जागतिक क्रमवारीत १०० स्थानावरील खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेतील तिचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत १०२व्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोव्हाने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना २-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. या विजयाबरोबर पिरोनकोव्हाने फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच प्रवेश केला.

मुसळधार पावसामुळे सोमवारी एकही सामना होऊ शकला नाही. मंगळवारीदेखील सामने सुरू होण्यास विलंब लागला. पिरोनकोव्हा व रडवानस्का यांच्यातील लढत पावसामुळे थांबली, त्या वेळी पिरोनकोव्हा २-६, ०-३ अशी पिछाडीवर होती. रविवारी रात्री हा सामना अंधूक प्रकाशामुळे अपूर्ण राहिला होता. मंगळवारी हा सामना पुढे सुरू झाला, तेव्हा पिरोनकोव्हाने सलग सहा गेम्स घेत आपली बाजू वरचढ केली होती. ३९ तासांनंतर हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर पुन्हा उभ्या राहिल्यानंतर पिरोनकोव्हाच्या आक्रमक खेळासमोर रडवानस्काला हतबल केले. सहा वर्षांपूर्वी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या पिरोनकोव्हाने ३-६, ६-३, ६-३ अशा फरकाने रडवानस्काला नमवले आणि उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी तिला समंथा स्टोसूरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्टोसूरने सहाव्या मानांकित सिमोना हॅलेपविरुद्ध  ७-६ (७-३), ६-३ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचच्या मदतीला पाऊस धावून आला.  रॉबर्टा बॅटिस्टा अ‍ॅग्युट याच्याविरुद्ध त्याने पहिला सेट ६-३ असा गमावल्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला. त्यामुळे जोकोव्हिचला या सेटमध्ये झालेल्या चुकांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. पावसाच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या खेळात मात्र जोकोव्हिचने पुढील सेट ६-४ असा जिंकला आणि तिसऱ्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेत दमदार पुनरागमन केले. मात्र पावसाने पुन्हा सव्‍‌र्हिस केल्याने खेळ थांबवण्यात आला. ‘‘सोमवारी पावसामुळे सामने झाले नाहीत. त्यामुळे आम्हाला २० लाख युरोचे नुकसान सोसावे लागले आहे. पुरुषांचा अंतिम सामना सोमवारी घेण्याबाबत आम्हाला स्वारस्य नाही. सर्व सामने रविवापर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे,’’ असे स्पर्धेचे संचालक गे फर्गेट यांनी सांगितले. पुरुषांचा अंतिम सामना सोमवारी खेळवण्याचा प्रसंग यापूर्वी १९७३ व २०१२ मध्ये अनुभवास आला होता. २०१२च्या अंतिम लढतीत राफेल नदालने जोकोव्हिच याच्यावर मात करीत अजिंक्यपद मिळविले होते.