विल्यम्स भगिनींचीही विजयी वाटचाल; मरेचे आव्हान संपुष्टात

गतविजेत्या आणि अग्रमानांकित राफेल नदालने गुरुवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजयी वाटचाल कायम राखताना तिसरी फेरी गाठली. याव्यतिरिक्त, पुरुष एकेरीत स्टॅनिस्लास वॉवरिंका, जुआन जॉन इस्नर यांनी, तर महिला एकेरीत सेरेना व व्हीनस विल्यम्स भगिनींनी दिमाखात तिसऱ्या फेरीत धडक मारली. मात्र माजी विजेत्या अँडी मरेचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.

जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असणाऱ्या नदालने वसेक पॉस्पिसिलचा ६-३, ६-४, ६-२ असा पराभव केला. वॉवरिंकाने युगो हम्बर्टवर संघर्षपूर्ण लढतीत ७-६, ४-६, ६-३, ७-५ असा विजय मिळवला. तसेच ११व्या मानांकित इस्नरने निकोलस जॅरीवर तब्बल तीन तास, १२ मिनिटे रंगलेल्या झुंजीत ६-७, ६-४, ३-६, ७-६, ६-२ अशी पाच सेटमध्ये मात केली. मात्र माजी विजेत्या मरेला स्पेनच्या ३१व्या मानांकित फर्नाडो वर्डास्कोकडून ७-५, २-६, ६-४, ६-४ असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला.

महिलांमध्ये सेरेनाने कॅरिना विटोफ्टवर ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवला, तर व्हीनसने कॅमिल जिओर्जीवर ६-४, ७-५ अशी सरशी साधली. तिसऱ्या फेरीत सेरेना आणि व्हीनस एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत.

बोपण्णाची आगेकूच

दुहेरीतील भारताचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि रॉजर वसलिन यांच्या जोडीने माकोस बगडॅटिस व मिश्चा झ्वेरेव्ह यांचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव करून पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली.