विजेतेपद मिळवण्यापेक्षा ते पुन्हा मिळवणे अधिक कठीण असते असे म्हटले जाते. तथापि रॅफेल नदाल याच्याबाबत हे विधान चुकीचे ठरेल. जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानचा खेळाडू नदाल याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचे आव्हान सरळ तीन सेट्समध्ये नमवले आणि अकराव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदावर मोहोर नोंदवली. त्याने ही लढत ६-४,६-३, ६-२ अशी जिंकली. नदालने हा सामना २ तास ४२ मिनिटांत जिंकला. सामन्यात थिमला एकही सेट जिंकता आला नाही.

नदाल या ३२ वर्षीय खेळाडूने यापूर्वी येथे २००५ ते २००८, २०१० ते २०१४ तसेच गतवर्षी विजेतेपद मिळवले होते. त्याने अकराव्यांदा विजेतेपद मिळवत मार्गारेट कोर्ट यांच्या अकरा विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली. नदाल याचे कारकिर्दीतील हे सतरावे अजिंक्यपद आहे. त्याने अमेरिकन स्पर्धेत तीन वेळा, विम्बल्डनमध्ये दोन वेळा व ऑस्ट्रेलियन स्पर्धेत एकदा जेतेपद पटकावले आहे. त्याने ऑलिम्पिकमध्येही एकदा सुवर्णपदक जिंकले आहे.

दरम्यान, महिला एकेरीच्या सामन्यात रोमानियाची सिमोना हालेप विजयी ठरली आहे. तिने अमेरिकेच्या स्लोन स्टिफन्सला नमवत तिने विजय मिळवला आहे. सिमोनाने आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकले आहे. सिमोना हालेपने स्लोन स्टिफन्सला ३-६, ६-४, ६-१ अशा सेटमध्ये हरवले.