माद्रिद : स्पेनच्या  राफेल नदाल याने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याने क्ले कोर्टवर सलग ५०वा सामना जिंकून जॉन मॅकेन्रो यांचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

मॅकेन्रो यांनी १९८४ मध्ये माद्रिद इनडोअर स्पर्धेत विजेतेपद मिळवत क्ले कोर्टवर सलग ४९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. नदालने माद्रिद खुल्या स्पर्धेतच दिएगो श्वार्टझमन याच्यावर ६-३, ६-४ असा विजय नोंदविला आणि पन्नासावा सामना जिंकण्याची किमया साधली. त्याची आता ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमशी गाठ पडणार आहे. नदालने गतवर्षी बार्सिलोना चषक, मॉन्टे कालरे करंडक, फ्रेंच खुल्या स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी केली होती.