निशिकोरीला नमवून जोकोव्हिचही अंतिम फेरीत; आज मध्यरात्री रंगणार विजेतेपदासाठी सामना

विश्वातील अव्वल क्रमांकाच्या टेनिसपटूविरुद्ध जेव्हा तुम्ही खेळता, तेव्हा तुम्हाला तुमचे सर्वस्व पणाला लावावे लागते. अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रथम मानांकित राफेल नदालविरुद्ध हाच मंत्र अवलंबला. दोन सेटमध्ये त्याने नदालला एक-एक गुणासाठी चांगलेच झुंजवले. याचाच फायदा त्याला झाला आणि थकव्या व गुडघ्याच्या जुन्या दुखापतीने पुन्हा मोक्याच्या क्षणी डोके वर काढले. त्यामुळे नदालला नाइलाजास्तव माघार घ्यावी लागली व डेल पोत्रोने धडाक्यात अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य लढतीत नोव्हाक जोकोव्हिचने जपानच्या केई निशिकोरीचा सहज पराभव करून डेल पोत्रोविरुद्ध रविवारी मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केले.

२००९ चा विजेता व तृतीय मानांकित डेल पोत्रोने गतविजेत्या नदालचा ७-६(७-३), ६-२ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच डेल पोत्रोने वर्चस्व मिळवले. त्याने ३-१ अशी आघाडी घेत नदालवर दबाव टाकला. यावेळी नदालने पंचांकडे विश्रांतीसाठी थोडा अवधी मागून त्याच्या उजव्या पायाला पट्टी बांधून घेतली. डेलपोत्रोने पहिला सेट टायब्रेकरद्वारा जिंकला. पुढील सेटमध्येही नदालने दुसऱ्यांदा गुडघ्यावर उपचार करून घेतले. अखेरीस वेदना असहाय्य होत असल्यामुळे नदालने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. नदालला यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतही मरिन चिलीचविरुद्धच्या लढतीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.

या लढतीच्या तुलनेत जोकोव्हिच याला निशिकोरीविरुद्ध विजय मिळविताना फारसा संघर्ष करावा लागला नाही. सहाव्या मानांकित व यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा विजेता जोकोव्हिचने जपानच्या केई निशिकोरी याची अपराजित्वाची मालिका ६-३, ६-४, ६-२ अशी सरळ तीन सेटमध्ये संपुष्टात आणली. त्याने चार वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. निशिकोरीने केलेल्या नकारात्मक चुकांचाच जोकोव्हिचला अधिक फायदा झाला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक नोंदविला. दोन्ही वेळा त्याने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. जोकोव्हिचला करिअरमधील १४ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद नोंदविण्याची संधी मिळाली आहे.

जोकोव्हिचचे डेल पोत्रोवर वर्चस्व

जोकोव्हिचने २०११ व २०१५ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याने आतापर्यंत डेलपोत्रो याच्याविरुद्ध झालेल्या १८ सामन्यांपैकी १४ वेळा विजय मिळवला असून डेल पोत्रोने चार सामन्यांत बाजी मारली आहे. २००७ व २०१२ मध्ये जोकोव्हिचने डेल पोत्रोला एकही सेट न गमावता हरवले होते.

नदालला माघार घ्यावी लागली याचे मला निश्चितच दु:ख झाले आहे. मात्र माझ्या आवडत्या टेनिस स्पर्धेत मला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. त्यामुळे आता विजय मिळवूनच राहणार.   – जुआन मार्टिन डेल पोत्रो